राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज
अलिबाग, पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पाली, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि खालापूर या सहा नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पोटनिवणुकीसाठीही मतदान होईल.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असले तरी जिल्ह्यात सहाही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोयीस्कर भूमिका घेऊन एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
सहा नगरपंचायतीमध्ये ओबीसी जागा वगळून 81 जागांसाठी 290 दाखल निवडणूक नामनिर्देशन अर्जांपैकी 53 जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 237 उमेदवार आहेत. दोन प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 79 प्रभागांमध्ये मतदान होत आहे.
यासाठी एकूण 34 हजार 640 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत मतदान होईल, तर 18 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. याचबरोबर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठीही मंगळवारी मतदान प्रकिया होणार असून याची मतमोजणी व निकाल लगेचच दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 22) आहे.