अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (दि. 20) राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला होता. त्यानुसार भाजपने अलिबाग तालुका तहसीलदारांना दुधाची पिशवी देऊन आंदोलन केले.
अलिबाग तहसीलदारांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, अलिबाग तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, अलिबाग युवा मोर्चा अध्यक्ष पुनीत शेठ यांनी दुधाची पिशवी व निवेदन देऊन आंदोलन केले.
दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपयांचे अनुदान द्यावे, गायीच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत.