Breaking News

युवा चेहर्यांना संधी; पृथ्वी शॉचे पुनरागमन; अग्रवाल, गिल, विहारी, सैनीलाही स्थान; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौर्‍याला मुकावे लागल्यानंतर भारतीय निवड समितीने कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे.

मुंबईकर पृथ्वी शॉने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. भारत ‘अ’ संघाकडून न्यूझीलंड दौर्‍यात आश्वासक कामगिरी करणार्‍या शुभमन गिल, हनुमा विहारी यांनीही कसोटी संघातील स्थान कायम राखले. यासोबतच नवदीप सैनीनेही कसोटी संघात स्थान मिळवले आहे. निवड समितीने इशांत शर्माला भारतीय संघात संधी दिलेली असली, तरी तो संघात खेळेल की नाही हे त्याच्या तंदुरुस्ती चाचणी (फिटनेस टेस्ट)वर अवलंबून असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीदेखील आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी बजावली होती. रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असून, त्यामुळे तो उर्वरित न्यूझीलंड दौर्‍यालाही मुकणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघाची घोषणा मंगळवारी

(दि. 4) केली. धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ या संघात परतला आहे. याशिवाय मयांक अग्रवाल, शुभमन गिलचाही समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर वन डे मालिकेनंतर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

असा असेल भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (फिट असेल तर संघात समावेश होईल.)

‘किवीं’नी कर्णधार बदलला वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या अंतिम दोन टी-20 सामन्यांत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टीम साऊदीने संघाची धुरा सांभाळली होते. आता वन डे मालिकेसाठी टॉम लॅथम याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो दुखापतीमधून बाहेर पडला, तर तिसर्‍या सामन्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply