Breaking News

बेपत्ता नागरिकांमध्ये वाढ; सुधागडात चिंतेचे वातावरण

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात अचानकपणे बेपत्ता होणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नंदीमाळ नाका येथील प्राजक्ता प्रदीप खाडे (32, मूळ राहणार रासळ, ता. सुधागड) ही महिला 9 जूनपासून पालीतून बेपत्ता झाली आहे.

सदर महिला 9 जूनला सकाळी 9 वाजता पेण येथून पाली अडुळसे येथे जाण्याकरिता निघून 11 वाजता पाली भोईआळी नाका येथील विक्रम स्टँडवर आली होती. तेथे भाचा प्रतिकेश यास अडुळसे येथे घरी जाते, असे सांगून पाली विक्रम स्टँडवरून कोणाला काही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. महिला हरविल्याची तक्रार 14 जुलैला पाली पोलीस ठाणे येथे महिलेचा पती प्रदीप प्रभाकर खाडे यांनी दिली आहे. उंची पाच फूट, वर्ण निमगोरा, अंगाने मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, अंगात शेवाळी रंगाचा पंजाबी ड्रेस व पायजमा, केस काळे, गळ्यात काळ्या मण्यांमध्ये ओवलेले छोटे मंगळसूत्र, पायात लाल रंगाची सँडल असे हरविलेल्या महिलेचे वर्णन आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन. व्ही. घासे करीत आहेत. दरम्यान, सुधागड तालुक्यातील गायमाळ आदिवासीवाडी येथूनही एक 23 वर्षीय तरुणी 27 जूनपासून अचानकपणे बेपत्ता झाली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये वाढ होत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

रोह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. रोहा तालुक्यात कोरोनो आटोक्यात अणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घरोघरी आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे, मात्र असे असतानाही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. सोमवारी (दि. 20) रोहा तालुक्यात 21कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोहा शहरात सर्वाधिक 19 कोरोनाबाधित एकाच दिवसात आढळले असून त्यातील शहरातील खालचा मोहल्ला धावीर रोड येथे 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोमवारी तीन व्यक्ती कोरोनावर मात करीत बर्‍या होत घरी परतल्या आहेत. रविवारीही रोह्यात 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. रोहा तालुक्यात आतापर्यंत 358 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सोमवारी तीन व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 272 झाली आहे. कोरोना संसर्गामुळे आठ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रोहा तालुक्यात आता 78 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रोहा शहरात 130, तर उर्वरित ग्रामीण भागात 228 कोरोना रुग्ण आढळले. रोहा शहरात 130 पैकी 78 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे, तर दोघांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. आता रोहा शहरात 50 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

रायगडातील खेळाडूंना मिळणार क्रीडा गुणांचा लाभ

अलिबाग ः जिमाका

राज्याचे क्रीडा धोरण 2012मधील शिफारशीनुसार राज्यातील इ. 10वी व 12वीच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येतात. रायगड जिल्ह्यातील एकूण एक हजार 198 खेळाडूंना या क्रीडा गुण सवलतीचा लाभ होणार आहे. जिल्हा स्तरावर प्रावीण्य मिळविलेले किंवा विभाग स्तरावर सहभाग घेतलेल्या खेळांडूना 5 गुण, विभाग स्तरावर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 10 गुण, राज्य स्तरावर सहभाग 10/12 गुण, राज्य स्तरावर प्रावीण्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग 15 गुण, तर राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 20 गुण याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.

1,198 खेळाडू विद्यार्थ्यांपैकी इ. 10वी मुले-372, इ. 10वी मुली-281, इ. 12वी मुले-366, इ.12वी मुली-179 यांना क्रीडा गुण मिळणार आहेत. या खेळाडूंत इ.10वीमध्ये सहा राष्ट्रीय खेळाडू, 51 राज्यस्तरीय खेळाडू, 21 विभागस्तरीय खेळाडू व 575 जिल्हास्तरीय खेळाडू आहेत, तर इ.12वीमध्ये नऊ राष्ट्रीय खेळाडू, 46 राज्यस्तरीय खेळाडू, 69 विभाग स्तरीय खेळाडू व 421 जिल्हा स्तरीय खेळाडू याप्रमाणे एकूण 15 राष्ट्रीय, 97 राज्य स्तरीय, 90 विभाग स्तरीय व 996 जिल्हा स्तरावरील प्रावीण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दहिवली पुलाजवळ आढळला बेवारस मृतदेह

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातून वाहणार्‍या उल्हास नदीवरील नेरळ-कळंब रस्त्यावर दहिवली येथील पुलाच्या कडेला गणेश घाट येथे एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचे नातेवाईक अथवा ओळखीच्या व्यक्तींकडून अद्याप संपर्क करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांकडून बेवारस मृतदेहाच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालेगाव येथील पोलीस पाटील प्रकाश भोईर यांना 17 जुलै रोजी काही लोकांकडून दहिवली गणेश घाट येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली. नेरळ पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. टी. धायगुडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. साडेपाच फूट उंचीच्या व्यक्तीची दाढी वाढली होती. डोक्यावरील केस व दाढीही पांढरी झाली होती. अंगावर पॅण्ट तसेच शर्ट असून ते मळकट झालेले होते. मृतदेहाला दुर्गंधी येत असल्याने शवविच्छेदन करण्यासाठी नेण्याची सोय नेरळ पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे. अशा वर्णनाची व्यक्ती हरवली असल्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply