पनवेल : रामप्रहर वृत्त – जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.
आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष होणारा उपयोग यामध्ये मोठी तफावत असते. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन क्षेत्रातील बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्सचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, या कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. कोर्सची पात्रता 10+2 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 45 टक्के सामान्य श्रेणीसाठी आणि 10+2 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 40 टक्के आरक्षित श्रेणीसाठी अशी आहे. यातील सत्र एक ते चार रेग्युलर बीएमएस कोर्सप्रमाणे (कालावधी दोन वर्षे) असून, सत्र पाच ते सहा कंपनी प्रशिक्षण असणार आहेत. त्याचा कालावधी एक वर्ष असेल. त्याचप्रमाणे या प्रशिक्षण कालावधीत 10 हजार रुपये वेतन मिळवण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे.
या कोर्सचा यशस्वीरित्या प्रारंभ करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. एस. टी. गडदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तर कोर्सचे नियोजन सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. तृप्ती जोशी आणि या कोर्सचे समन्वयक प्रा. कुशलकुमार कुराणी यांनी केले आहे.