Breaking News

मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट?

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 190.89 दशलक्ष घनमीटर एवढी असून, धरण 88 मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण भरण्यासाठी तीन हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची गरज आहे. 26 जुलैपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1081.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची सध्याची पातळी 76.70 मीटर इतकी आहे. पुढे पावसाने दडी मारल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. 98 वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठी शिल्लक राहिला. मे, 2020 पर्यंत धरणातील पाण्याची पातळी 74 मीटर इतकी होती. जून आणि जुलै महिन्यात यात केवळ 2.70 मीटर इतकी वाढ झाली आहे, तर या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त 1081.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण धरण्यासाठी आणखी 2000 ते 2500 मिमी पावसाची आवश्यकता आहे.

गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती.

नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. या धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो. 2018 मध्ये 25 जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते, तर 2019 मध्ये 4 ऑगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते. या वर्षी जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कोसळणार्‍याा पावसावरच नवी मुंबईकरांवरील पाणीकपातीचा निर्णय अवलंबून आहे.

विविध ठिकाणी होतो जलपुरवठा

महापालिका मोरबे धरणातून शहरवासीयांना 24 तास मुबलक पाणीपुरवठा करते. त्यासाठी धरणातून दररोज 420 एमएलडी इतके पाणी घेतले जाते. नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे आणि मोरबे धरण परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply