पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती अॅड. मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी सोमवारी (दि. 24) जाहीर केले. पनवेल महापालिका झाल्यावर प्रभाग क्र. 17मधून अॅड. मनोज भुजबळ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांना बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. बांधकाम समितीचे सभापती म्हणून त्यांनी पनवेल महापालिकेत चांगले काम केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला न्यायालयातील कामकाज समजावे यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अधिवक्ता परिषदेमार्फत प्रयत्न करून पनवेल न्यायालयातील संपूर्ण कामकाज मराठीत चालवण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखविला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.