पनवेल ः वार्ताहर
तळोजा, सेक्टर-11मधील मेट्रो पॉइंट इमारतीत राहणार्या रेखा हरिद्वार शर्मा (45) या महिलेची अज्ञात मारेकर्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रेखा शर्मा आपल्या घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मृत रेखा शर्मा तळोजा फेज-1मधील मेट्रो पॉइंट इमारतीत पती आणि मुलासह राहण्यास होत्या. 24 ऑगस्टला सकाळी रेखा शर्मा यांचे पती व मुलगा कामानिमित्त बाहेर गेले असता रेखा शर्मा घरात एकट्याच होत्या. यादरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घुसलेल्या अज्ञात मारेकर्याने रेखा शर्मा यांचा गळा धारदार चाकूने चिरून त्यांची हत्या करून पलायन केले. तळोजा फेज-2मध्ये राहणारी रेखा शर्मा यांची विवाहित मुलगी मनीषा सियाली सकाळपासून त्यांना मोबाइलवरून संपर्क करीत होती, मात्र रेखा शर्मा फोन उचलत नसल्याने मनीषा वडिलांकडून डुप्लिकेट चावी घेऊन आईला बघण्यासाठी घरी गेली होती. या वेळी रेखा शर्मा किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेखा शर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.