Breaking News

भोंग्यांच्या मुद्यावरून पनवेलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त

पनवेल : रामप्रहर वृत्त

भोंग्यांच्या मुद्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारी (दि. 4) राज्यभरात सुरू असलेल्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.

बुधवारी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये एसआरपीएफच्या तुकड्या बाहेरून मागविण्यात आल्या तसेच 85 अधिकारी, 400 कर्मचारी आणि 30 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त परिमंडळ 2च्या हद्दीमध्ये तैनात करण्यात आला.

मंगळवारी (दि. 3) साजरा झालेला अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा सण पनवेलमध्ये शांततेत पार पडला, परंतु बुधवारी भोंग्यांच्या वादावरून सुरू असलेल्या वादाच्या अनुषंगाने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली.

सर्व जाती धर्मियांनी पोलिसांना सहकार्य करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी बाळगावी, तसेच आपल्या आजूबाजूला कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा प्रसंग घडत असल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडून करण्यात आले, तसेच कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक पोलीस कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कायदा सर्वांसाठी समान

कायदा आणि सुव्यवस्था विघडवण्याचे किंवा कायदा हातात घेण्याचे काम जर कोणी केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या व्यक्ती समाजात तेढ निर्माण करतील किंवा काही गैरकृत्य करू शकतात अशी शंका होती त्या लोकांना आम्ही तडीपार केलेले आहे. काही लोकांनी आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवले असून त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल केलेले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply