मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 5) बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
पुण्यातील कोरोनासंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून, कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढविणे आवश्यक असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाला हरविण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जनजागृतीसाठी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे आणि इतर अनेक सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले. मास्क न घालणार्या लोकांवर आणि कुठेही थुंकणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. पुणेकरांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासून दिलासा देण्याकरिता ‘डरो मत.. सावधानी करो’ असा नारा देत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे, असे जावडेकर यांनी या वेळी सांगितले.