मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून सर्वच अधिकारी-कर्मचारीवर्गाला कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तशी व्यवस्था विधान भवन परिसरात करण्यात आली आहे, मात्र नियोजनशून्य कारभारामुळे तेथे गर्दी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, या चाचणीदरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढणार तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विधानसभेचे अधिवेशन दोन दिवसांवर आले आहे. अशात विधानसभा अध्यक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशनात आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Check Also
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …