Breaking News

‘अवकाळी’ने निर्माण होणार्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांना कृषी सल्ला

उत्तर कोकण किनारपट्टी विभागात (रायगड, ठाणे व पालघर जिल्हा) काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भातपिकाची मळणी राहिली असल्यास भात सुरक्षित ठेवावे. आंबा, काजू बागेमध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी करण्यात येणार्‍या कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीची कामे पुढे ढकलून पावसाची उघडीप असताना करावी.

भुईमूग पिकाची पेरणी व कलिंगड पिकाची रोपे लावून लागवड करायची राहिली असल्यास ती पुढे ढकलून जमीन वाफसा स्थितीत आल्यावर करावी. कलिंगड तसेच हरभरा लागवडीतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. काढणी केलेली सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी व नारळ, सुपारी बागेस पाण्याची पाळी देणे पुढे ढकलावे. वेलवर्गीय भाजीपाला पिकांना मातीचा भर द्यावा तसेच बुंध्याजवळ पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पांढर्‍या कांद्याची उगवण बाधित झालेल्या रोपवाटिकेतील पुन्हा पेरणी करावयाची कामे तसेच वाल पिकाची पेरणी राहिली असल्यास पुढे ढकलावी व जमीन वाफसा स्थितीत आल्यावर पूर्ण करून घ्यावी. केळी बागेस आधार देऊन रोपांना मातीचा भर द्यावा तसेच बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. वांगी, मिरची, टोमॅटो भाजीपाला पिकाची रोपवाटिकेसाठी पेरणी करावयाची राहिली असल्यास पुढे ढकलावी व जमीन वाफसा स्थितीत आल्यावर पूर्ण करावी. या पिकांवर पाने खाणारी अळी, तुडतुडे, मावा किडींचा प्रादूर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी मॅलेथीऑन 20 मिली किंवा डायमेथोएट 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रसशोषक किडी (मावा, तुडतुडे व पांढरी माशी) नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी 25 ते 30 असे शेतात लावावेत.

पानवेल, अस्टर व भाजीपाला लागवडीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. पानवेलींना आधार देऊन मर रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा 2 लिटर 200 किलो सेंद्रिय खताबरोबर जमिनीत द्यावे. वेलवर्गीय भाज्यांवर केवडा रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास कार्बेन्डँझिम 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन करणार्‍या शेतकर्‍यांनी जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधण्याची व्यवस्था करावी, तसेच पावसाचे पाणी गोठ्यात साठणार नाही याची काळजी घ्यावी.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा डिसेंबरमध्ये चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात डिसेंबर-जानेवारीत मोठ्या पावसाची शक्यता आहे तसेच डिसेंबरमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातही कोकण व मुंबई विभागांमध्ये कमी पाऊस होईल तर तुलनेने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगफुटीसह मुसळधार पाऊस व पुराचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे आंबा झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊ शकते, तसेच या अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर कीड व रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा आंबा बागायतदारांनी आंबा बागांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून कीड व रोगांची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे का याची पाहणी करून वेळेत कीड व रोगनिहाय उपाययोजना कराव्यात.

पावसानंतर वातावरण ढगाळ राहिल्यास आंबा पालवी/मोहोरावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पावली/मोहोर अवस्था 10 तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास प्रभावी व्यवस्थापना करिता लॅम्बडा सायहेलीथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मिली प्रतीलिटर पाणी या प्रमाणात वापरावे. तुडतुड्यांप्रमाणे पालवी/मोहोरावर फुलकिडीचा व मीजमाशीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादूर्भाव आढळून आल्यास या किडींच्या व्यवस्थापनासाठी थायोमेथाक्झॉम 25 टक्के व 2 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशक लेबल क्लेम नाही.)पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये आर्द्रता वाढल्यास व तापमानामध्ये घट झाल्यास भुरी व करपा या रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मिली किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचबरोबर करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डॅझिम 12 टक्के+मॅन्कोझेब 63 टक्के हे संयुक्त बुरशीनाशक 10 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

-डॉ. रवींद्र मर्दाने, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड. मोबाईल 9764120470

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply