नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा ‘रन’संग्राम होणार आहे.
कोविड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. आयपीएलच्या नव्या वेळापत्रकानुसार 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होईल. त्यानंतर 3 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळ ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल. आयपीएलच्या 13व्या हंगामाच्या वेळापत्रकानुसार 24 सामने दुबई, 20 सामने आबुधाबी आणि 12 सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.