Breaking News

रेशन काळाबाजाराशी कोणताही संबंध नाही! इक्बाल काझी यांचा पनवेल पोलिसांकडे खुलासा

पनवेल : वार्ताहर

पळस्पे फाटा येथे अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या शासकीय रेशन तांदळाच्या साठ्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोदाम मी मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता पूर्ण जबाबदारीनिशी भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे या गोदामात घडलेल्या गुुन्ह्यातील आरोपींमधून माझे नाव काढून टाकावे, अशी मागणीही गोदामाचे मालक इक्बाल काझी यांनी पनवेल शहर पोलिसांकडे लेखी खुलाशाद्वारे केली आहे. दरम्यान, इक्बाल काझी हे पनवेल परिसरातील प्रसिद्ध उद्योजक असून, त्यांच्याकडून अशा प्रकारे कोणतीही चुकीची कृती होणार नाही, अशी खात्री पनवेल परिसरातील अनेक जण व्यक्त करीत आहेत. गेल्या महिन्यात पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथील गोदामात अवैधरीत्या साठा करून ठेवलेला 110 टन शासकीय रेशन तांदूळ पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केला होता. यामध्ये आरोपी म्हणून गोदामाचे मालक व पनवेलमधील प्रतिथयश नागरिक इक्बाल काझी यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत यांना लेखी खुलासा सादर केला आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, मी माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे पळस्पे फाटा येथील संबंधित गोदाम 14 ऑक्टोबर 2015पासून अंधेरी (मुंबई) येथील मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता भाडेतत्त्वावर दिलेले आहे. या भाडेकरारानुसार हिंद टर्मिनल्स कंपनी माझ्या गोदामात व्यवसाय करीत असताना त्याची संपूर्ण जबाबदारी या कंपनीची आहे. तेथे कोणता माल येतो व जातो याची मला काहीएक कल्पना नाही. त्यामुळे तेथील कोणत्याही व्यवहाराशी माझा काहीएक संबंध नाही. रेशनच्या काळाबाजाराचे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित गोदाम व कारवाईविषयी अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या, मात्र गोदामाचे मालक इक्बाल काझी यांनी या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा योग्य तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव आरोपींमधून काढून टाकण्यात येईल, असे पोलिसांनीही सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. इक्बाल काझी हे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन असून, मोठ्या विश्वासाने पनवेलमधील या संस्थेच्या सदस्यांनी त्यांना संचालकपदी म्हणून निवडून दिले आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांनी स्वत:चे लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा तसेच संस्थेचा कायापालट करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे रेशन काळाबाजार प्रकरणात त्यांचे नाव गोवण्याचा प्रकार झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा झाली होती, मात्र पोलिसांकडून त्यांचे नाव आरोपींमधून काढून टाकण्यात येणार असल्याने या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply