खारघर : रामप्रहर वृत्त
सिडकोने खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि खुल्या गटारावर झाकण बसविण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे सिडकोने नेमलेल्या ठेकेदाराने कोणती कामे केली, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खारघर वसाहत सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यंदा रस्त्याचे किरकोळ कामे सिडकोने करावीत, असे ठरले होते. त्यासाठी पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पदपथांची दुरुस्ती आणि खुल्या मॅनहोलची झाकण बसविणे या तीन कामासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयेप्रमाणे तीन कोटी खर्च करून एजन्सीची नेमणूक केली आहे. खारघर वसाहतीतील सिडको कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले खारघरचे प्रवेशद्वार, बँक ऑफ इंडिया सर्कल तसेच डेलीबाजार, सेक्टर 20-21मधील अपीजन शाळा, जलवायूकडून जय भवानी मंदिराकडे जाणारा रस्ता, ओवेगावकडे जाताना सेंट्रल पार्क सर्कल आदी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने खड्ड्यात पेव्हर बसविण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी सिडकोच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
खारघरमधील खड्डे बुजवण्याचे काम सिडकोचे आहे. मात्र खड्ड्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे पनवेल महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
-जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर