Breaking News

पनवेलमध्ये होळीसाठी शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल परिसरात होळी सण उत्साहात साजरा केला जातो. होळीमध्ये जाळण्यासाठी  लाकडाबरोबरच आता शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा हा उद्देश ही सफल होताना दिसत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. यावर्षी सगळीकडे होळी पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा सोमवार 7 मार्च रोजी होळी आहे. पनवेल परिसरात रहिवाशी सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक सोसायटीत होळी साजरी केली जाते. होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली जात असते, पण आता झाडेच कमी झाली असल्याने होळीला लाकडे मिळत नाहीत. लाकडांना पर्याय म्हणून शेणींचा वापर केला जात असल्याने पनवेल परिसरात शेणींची मागणी वाढली आहे. इतर वेळी दोन रुपयांना विकली जाणारी शेणी बाजारात तीन ते पाच रुपयांना मिळत आहे.  पनवेलच्या करंजाडे परिसरात असलेल्या तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांचा शेणी विकण्याचा व्यवसाय आहे. भावनागरहून  42 वर्षा पूर्वी हे कुटुंब पनवेलमध्ये आले. या कुटुंबात झीलू लाखा भरवाड सर्वांत ज्येष्ठ महिला आणि त्यांची सून मिना भुपा भरवाड या शेणी बनवतात दिवसाला हजार शेणी त्या बनवितात. पूर्वी  म्हशी जास्त असल्याने रोज 26-27 घमेली शेण असायाचे त्यावेळी त्यांची नात सून खोपा भरवाड व इतर कुटुंबीय त्यांना मदत करीत असे. आता पर्यंत दोन दिवसांत पाच हजार शेणींची विक्री झाली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत यापेक्षा जास्त विक्री होईल, अशी माहिती त्यांनी दिली. होळीसाठी लाकडे वापरून पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते त्याचा परिणाम पर्जन्यावर ही होत असल्याचे दिसून आले आहे. होळीसाठी शेणींचा वापर सुरू होणे हे चांगलेच आहे. याशिवाय  गाईच्या शेणापासून मशीनवर बनवलेली होळी स्टिकचा ही सध्या वापर केला जातो. दोन फुटाची ही स्टिक 700 ग्राम ते एक किलोच्या आसपास असते. एक स्टिक 10 ते 15 रुपये दराने मिळते. एका सोसायटीला 75 ते 100 अशा स्टिक पुरेशा होतात. एक गाव एक होळी, किंवा एक आळी एक होळी अशी संकल्पना आता राबवायला हवी, यामुळे झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा हा उद्देश सफल व्हायला मदत होईल.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply