कर्जत : बातमीदार – कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे आदिवासी, कामगार, घरकाम करणार्या महिला तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांचा रोजगार हिरावला असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा केंद्र संचलित व केंद्रीय समाज कल्याण बोर्ड दिल्ली यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्या ’सोबतीण’ कुटुंब सल्ला सहाय्य केंद्राच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. या अंतर्गत कर्जत तालुक्यातील 190 महिलांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
कर्जतच्या उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली परदेशी आणि मुंबईस्थित उद्योजिका निती गोयल यांच्या लाला भगवानदास ट्रस्टने कर्जत तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी धान्याचे किट उपलब्ध करून दिले. एकट्या महिला कुटुंब प्रमुख म्हणून परिवार चालवणार्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला अशा कर्जत तालुक्यातील बेकरे, माणगाव, धनगरवाडी, ठाकूरवाडी तसेच कोंदिवडे, खरवडी येथील महिलांना ही मदत देण्यात आली.
दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले, तसेच अनिता जाधव, विमल देशमुख, सोबतीण संस्थेच्या समुपदेशिका माधुरी कराळे, पाली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष देशमुख, दिशा केंद्रचे रवी भोई, विमल देशमुख यांनी तालुक्यातील विविध भागांत जाऊन ही मदत वाटप केली.