3000 किट प्राप्त
पनवेल ः बातमीदार
पनवेल महानगरपालिका हद्दीपाठोपाठ आता पनवेलच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाच्या अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. 3 सप्टेंबरपासून पनवेलच्या ग्रामीण भागात अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तालुक्यातील नेरे, अजिवली, आपटा, वावंजे, गव्हाण या प्राथमिक आरोग्य केंद्रांत अँटिजेन टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर उलवे सिडको नागरिक आरोग्य केंद्रातदेखील अँटिजेन टेस्टचा प्रारंभ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नुकतेच गणेश विसर्जन झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे संक्रमण अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात दिवसाला 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत. त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत ही आकडेवारी दिवसाला अडीचशे रुग्णांपर्यंत पोहचली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता महानगरपालिका हद्दीपाठोपाठ ग्रामीण भागातदेखील कोरोनाच्या अँटिजेन टेस्टला सुरुवात झाल्याने नागरिकांनी ताप, थंडी किंवा सर्दी झाली असल्यास ताबडतोब अँटिजेन टेस्ट करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अँटिजेन टेस्टसाठी 3000 किट प्राप्त झाल्या आहेत. एकूण 371 टेस्ट घेण्यात आल्या असून त्यापैकी 23 पॉझिटिव्ह आणि 348 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप या अँटिजेन टेस्टला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्याविषयीची जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.