Breaking News

आपण घरात बसलो होतो तरी, ते आपल्यासाठी काम करत होते…

सहा लाख गावांचा देश सहा महिने थांबला होता, तेव्हा लाखो भारतीय काम करतच होते. आजच्या अभूतपूर्व अशा स्थितीत आजूबाजूला अनेक विसंगती दिसत असल्या तरी त्या भारतीयांनी केलेल्या कामाचा गौरव केलाच पाहिजे. तो केला आणि त्यांची जाणीव ठेवली तरच यापुढील कठीण आव्हानांचा सामना आपण करू शकणार आहोत. सहा महिन्यांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनचा हा अनुभव त्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल.

सध्याच्या अभूतपूर्व अशा संकटात कोणता समूह कसा वागतो आहे, याप्रश्नाचे उत्तर सोपे नाही. एक समूह दुसर्‍या समूहावर आरोप करू लागला असून यातून परस्परांवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. हे रोखण्यासाठी एक साधी गोष्ट आपण जागरूक नागरिक या नात्याने केली पाहिजे, ती म्हणजे या बाबतीत तरी सोशल मिडियाची आपल्या मनावरील घुसखोरी कमी केली पाहिजे. छापील शब्दांवर आणि समोर दिसणार्‍या चित्रांवर डोळे झाकून आपला समाज विश्वास ठेवतो आणि त्याचाच गैरफायदा आपल्यातीलच काही समाजकंटक घेत आहेत. त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, ही जबाबदारी आपलीच आहे. कारण समाजाचा डोलारा केवळ सरकारी प्रशासनाच्या नियंत्रणाने उभा रहात नाही, तो समाजाच्या व्यक्तीमत्वावर उभा असतो. भारतीय समाजामध्ये अनेक विसंगती आहेत, हे नाकारण्याचे कारण नाही, पण असे काही रसायन त्यात आहे, की मोठमोठ्या संकटातही ते आपले चांगुलपण सिद्ध करते. मुंबई 2005ला जेव्हा अतिवृष्टीमुळे तीन दिवस पाण्यात होती, त्या तीन दिवसांत परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेतल्याची एकही घटना घडली नाही. लाखो नागरिक एकत्र येतात, मात्र तेथे घडणारे गुन्हे अगदीच किरकोळ असतात, हे तर अनेकदा आपण पाहिले आहे. कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला गेल्या आठवड्यात सहा महिने पूर्ण झाले, याकाळातही या समाजाने काही मोजके अपवाद वगळता, ती प्रगल्भता दाखवून दिली आहे. सध्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या या काळात आपणच आपल्या पाठीवर थाप मारून हा चांगुलपणा पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे.

लॉकडाऊनमध्ये माणुसकीचा वस्तुपाठ

सर्वजगच एका संभ्रमात सापडल्याने जगाची कोंडी झाली आहे. त्यामुळे आपल्या देशात जे वाईट होते आहे, ते बहुतेक सर्वच देशांमध्ये होते आहे, याचे भान अशावेळी आपल्याला असले पाहिजे. या संकटामुळे भविष्य धूसर झाल्याने सर्वच नागरिक अस्वस्थ झाले आहेत आणि ते साहजिकच आहे. अशा या आव्हानात्मक स्थितीत काय काय चांगले होते आहे, याकडे मनाची उभारी टिकण्यासाठी आपण आवर्जून पाहिले पाहिजे. उदा. सहा महिने व्यवहार बंद आहेत, असे आपण म्हणत असतानाच जीवनावश्यक वस्तूंची कोठे टंचाई निर्माण झाली, असे घडले नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक हे मोठेच आव्हान असताना त्याचा गैरफायदा घेऊन त्या चढ्या किंमतीला विकण्याचे प्रकार क्वचितच घडले. देश छोटा असता आणि लोकसंख्या एक दोन कोटी असती तर यागोष्टींचे कौतुक करण्याचे काही कारण नाही. कौतुक यासाठी की सहा लाख गावांच्या आणि 136 कोटी लोकसंख्येच्या देशात हे घडले आहे. कोट्यवधी माणसे घरी बसली होती, तेव्हा त्यांच्या गरजा भागविण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यात लाखो माणसे कामे करत होती, म्हणून ताजी भाजी आणि फळे शहरांच्या कानाकोपर्‍यात मिळत होती. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, शेतकरी, सफाई आणि सरकारी कर्मचारी यांचा देशाने कोरोना योद्धे म्हणून गौरव केला आहेच. पण त्याशिवाय किती समूह असे होते, ते केवळ व्यवहार म्हणून कामे करत नव्हती, याकाळात एकमेकांना मदत करण्यातच माणुसकी आहे, याचा वस्तुपाठ ते गिरवत होते. याकाळात झालेल्या चुकांविषयी बोलले पाहिजे आणि त्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजीही घेतली पाहिजे, हे जेवढे खरे आहे, तेवढेच चांगुलपणावरील विश्वास उडता कामा नये, याचेही भान ठेवले पाहिजे.

त्यांनी केली 5000 कोटींची बचत!

भारताच्या अर्थकारणात अशीच एक चांगली घटना लॉकडाऊनमध्ये घडली आहे, तिचीही दखल घेतली पाहिजे. ती म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भूमिका बजावणार्‍या तेलांच्या साठ्याची. आपली तेलाची 85 टक्के गरज आयातीने भागविली जाते, त्यामुळे त्यासाठी सर्वाधिक परकीय चलन खर्च होते. तेलाच्या किंमती वाढल्या की आपले अर्थकारण गडबडते. पण कोरोनामुळे तेलाची जगातील मागणी कधी नव्हे इतकी कमी झाली. त्याचा परिणाम म्हणजे तेलाच्या किंमती आपटल्या. भारतातही तेलाचा वापर कमी झाला होता, पण ती भारतासाठी एक संधीही होती. ती संधी सरकारी तेल कंपन्यांनी पुरेपूर घेतली. त्यांनी याकाळात तेलाची आयात चालूच ठेवली आणि देशात शक्य असतील तेवढा साठा करून घेतला. त्यामुळे सरासरी एक पिंप 19 डॉलरप्रमाणे तेल खरेदी करून तब्बल 5000 कोटी रुपयांची (68.51 कोटी डॉलर) बचत आपण केली. कोठे 60 डॉलरला एक पिंप आणि कोठे 19 डॉलरला! सर्व व्यवहार थांबले असताना हे अवाढव्य काम मात्र सुरु होते. ते किती अवाढव्य होते, याची कल्पना यावी, यासाठीची ही एक आकडेवारी पहा. तेलाचा सर्वाधिक वापर करणारा भारत जगातील तिसरा देश आहे. तेलाचा साठा करण्याची एकूण क्षमता 5.33 दशलक्ष टन असून तो देशाला पुढील साडे नऊ दिवसच पुरू शकतो. आणखी 6.5 दशलक्ष टन साठा वाढविता येईल, असे प्रकल्प सध्या उभे राहत असून त्यांचा वापर सुरु झाल्यास एका महिन्याचा साठा भारत करू शकेल. याचा उद्देश्य तेलाचे भाव खाली आल्यास त्याचा साठा करून परकीय चलन वाचविणे हा आहे. लॉकडाऊनमध्ये हे सर्व काम सुरु होते. त्यामुळे मोठी बचत झाली आणि सध्याच्या कठीण काळात तो पैसा इतरत्र वापरण्यास मुभा मिळाली.

त्याच नाण्याची दुसरी बाजू

एकीकडे हे सर्व चांगले असले तरी तेलाच्या या अर्थचक्रात आपण कसे अडकलो आहोत, पहा. तेलाच्या किंमती कोसळल्यामुळे तेल उत्पादनावरच अवलंबून (89 टक्के) असलेल्या कुवेतचे अर्थकारणही कोसळले आणि तो देश कर्जबाजारी झाला. मूडीजने त्या देशाचे रेटिंग खाली आणल्याने तो देश अडचणीत आला आहे. कारण 140 अब्ज डॉलर अर्थव्यवस्था असलेल्या कुवेतवर 46 अब्ज डॉलरचे कर्ज झाले आहे. एकूणच तो देश अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले तेव्हा त्या देशात असलेले परदेशी कामगार बाहेर काढण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो आहे. ज्या तेलाच्या किंमतीने एकीकडे आपल्याला साथ दिली, त्याच तेलाच्या किंमतीने दुसरीकडे आपल्याला कसे अडचणीत आणले आहे पहा. कुवेतमध्ये 14.5 लाख भारतीय काम करतात. नव्या सुधारणा प्रत्यक्षात आल्या तर त्यातील आठ लाख भारतीयांना तो देश सोडावा लागेल. 2018 मध्ये कुवेतमधील भारतीयांनी 4.8 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 28 हजार कोटी रुपये रिमीटन्स पाठविला आहे. आठ लाख भारतीयांना परत यावे लागले तर भारतात येणारा सुमारे 15 हजार कोटी रुपये रिमीटन्स थांबेल. गेल्या काही दशकांत जागतिकीकरणाला जो प्रचंड वेग आला आहे, त्याचे परिणाम कसे सर्वव्यापी होत आहेत, याची यावरून कल्पना यावी.

ते चांगले, मग आम्ही वाईट कसे असू?

परदेशात जाऊन काम करणार्‍या नागरिकांच्या संख्येचा विचार करावयाचा तर ती चीननंतर भारतीयांचा नंबर जगात सर्वाधिक आहे. त्यामुळेच जगात सर्वाधिक रिमीटन्स (78 अब्ज डॉलर) मिळविणारा आपला देश आहे. परदेशी राहणारे नागरिक जे परकीय चलन भारतात पाठवितात, त्याला रिमीटन्स म्हणतात. त्यामुळे आपल्याकडील परकीय चलनाचा साठा चांगला राहतो. सध्यातर तो विक्रमी 542 अब्ज डॉलर इतका आहे. विदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे स्वागत होते आणि ते एवढे प्रचंड पैसा कमावतात, याचे काहीतरी कारण असेल की. ते कारण असे आहे की ते शिस्तबद्ध, अधिक काम करणारे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर राखणारे म्हणून ओळखले जातात. भारतीयांना जर बाहेरचे जग एवढे मार्क देतात, तर त्यांचेच भाऊबंद असलेले आपण भारतातले भारतीय, सोशल मिडिया आणि मिडियामध्ये आज जशी चर्चा केली जाते, तितके वाईट कसे असू? खरोखरच आपण वाईट नाही आहोत, हे गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये आपण दाखवूनच दिले आहे. आता पुढील आव्हाने आणखीच कठीण आहेत, आणि त्यात आपल्या या संमजसपणाची खरी कसोटी लागणार आहे.

-यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply