Breaking News

पडझडीतही टिकून राहतील अशा आणखी काही कंपन्या

परदेशी बाजार पडले म्हणून भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात पडझड झाली आणि ती लगेच भरूनही आली. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. अशा बाजारातील चांगले शेअर्स घेऊन शांत बसायचे, ते त्यासाठी. असेच आणखी काही चांगले शेअर्स.

मागील आठवड्यात गुरुवारी बाजार पडल्यावर आता कोणते शेअर्स खरेदी करायचे असा प्रश्न माझ्याकडील गुंतवणूकदारांनी मला विचारला. आता प्रश्न आहे की दीर्घमुदतीसाठी शेअर्स निवडायचे असतील तर ते उत्तम कंपन्यांचे असण्यावरच माझा जोर असतो, जरी लघु मुदतीत त्यामधील परतावा थोडा कमी असेल तरी. पौष्टिक संपूर्ण जेवण करायचं आहे की चटपटीत काही तोंडात टाकायचं आहे हा ज्याचा त्याच्या आवडीचा व निवडीचा प्रश्न आहे. त्यामुळं आपल्या प्रकृतीस सोसेल तसंच जेवण आपण आयुष्यभर घेत असतो आणि कधीतरी चैन म्हणून इतर गोष्टींच्या आहारी जातो. चायनीज, पावभाजी, वडापाव बर्गर, सँडविच असल्या गोष्टी आपल्याला लुभावतात परंतु आपल्या तब्येतीस त्या चांगल्या नसतातच. अगदी त्याचप्रमाणं काही कंपन्यांचे शेअर्स हे आपल्याला खरेदी करण्यासाठी मोहात पाडत असतात, जसे की येसबँक, आयडीया किंवा आरकॉम. परंतु अशा कंपन्या आपल्या गुंतवणुकीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. म्हणून अशा कंपन्या केवळ कमावलेल्या नफ्यातून खरेदी करण्यास हरकत नाही परंतु अशा कंपन्यांचं एकत्रित मूल्य हे पोर्टफोलिओ मूल्याच्या केवळ एक किंवा दोन टक्केच असावं.

आज देखील काही विविध क्षेत्रांतील निवडक मिडकॅप व स्मॉल कॅप कंपन्यांवर नजर टाकू.

प्रॉक्टर अँड गॅम्बल :

एफएमसीजी क्षेत्रातील असलेल्या कंपनीची उत्पादनं सर्वांच्याच परिचयाची आहेत. एरियल, टाईड, ओले, पॅम्पर्स, व्हिस्पर, जिलेट, ओल्ड स्पाईस, हेड अँड शोल्डर्स, पॅन्टीन, ओरल बी, व्हिक्स, अशी उत्पादनं बनवणारी ही मूळची अमेरिकन कंपनी असून मिडकॅप पर्यायात मोडणार्‍या ह्या कंपनीनं 45 देशांत आपलं बस्तान बसवलेलं आहे.

बाजारमूल्य : 7900 कोटी रुपये. 

विक्रीवृद्धी दर : 11 टक्के

(मागील तीन वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 47.5 टक्के

(मागील तीन वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 27.4 टक्के

पीव्हीआर :

पीव्हीआर सिनेमाज ही एक फिल्म एंटरटेनमेंट कंपनी आहे. कंपनीने प्रिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हिलेज रोड शो लिमिटेड यांच्यात 1995मध्ये 60:40 गुणोत्तरामध्ये संयुक्त उद्यम करार करून व्यवसायास 1997मध्ये सुरुवात केली. आजच्या घडीची भारतातील ही सर्वात मोठी आलिशान अशी सिनेमा चेन आहे. ऑगस्ट 2018 मध्ये कंपनीनं चेन्नईस्थित सत्यम सिनेमा या कंपनीचं देखील अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं. 2019पर्यंत कंपनीनं 800पेक्षा जास्त स्क्रीन्स चालवण्याचा टप्पा पार केला होता. लॉकडाऊनमध्ये कंपनीचा व्यवसाय ठप्प असून आता जशी थेटर्स व सिनेमागृहांना परवानगी मिळेल, तसं कंपनीचा व्यवसाय चालू होईल.      

बाजारमूल्य : 5800 कोटी रुपये. 

विक्रीवृद्धी दर : 26.17 टक्के

(मागील दहा वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 43.3 टक्के

(मागील दहा वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 21.6 टक्के

रेमंड्स :

सुटिंग शर्टींगमधील एकमेव नावाजलेलं व सर्वांच्याच कपडे खरेदीत अव्वल स्टेटस ठरवणारं नाव म्हणजे रेमंड्स.  शुटिंग शर्टींग व्यतिरिक्त आता खास मापानं कपडे शिवून देणं, पार्क ऍव्हेन्यू, कलरप्लस, पार्क्स, एथनिक्स, या ब्रॅण्ड्स अंतर्गत रेडी मेड्स,  गारमेंटिंग, वैयक्तिक उत्पादनं, डेनिम, कामसूत्र ब्रँड अंतर्गत कंझुमर प्रॉडक्ट्स, जे अँड के अंतर्गत हॅन्ड व पॉवर टूल्स, रिंग प्लस ऍक्वा या कंपनीच्या अधिग्रहणासह ऑटोमोटिव्ह घटक देखील निर्यात करते. अशी ही मल्टिसेक्टर कंपनी असून 1925पासून गारमेंट्सच्या व्यवसायामुळं सर्वांच्याच जिव्हाळ्याची आहे. जी त्यामानानं अत्यंत कमी बाजारमूल्यास उपलब्ध आहे.

बाजारमूल्य : 1690 कोटी रुपये. 

विक्रीवृद्धी दर : 10 टक्के

(मागील दहा वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 35.7 टक्के

(मागील दहा वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 15.4 टक्के

स्टरलाईट टेक्नॉलॉजीज :

1988मध्ये स्थापन केलेली एक डिजिटल तंत्रज्ञान कंपनी आहे जिची भारत, चीन, यूएस, एसईए, युरोप आणि एमईएमधील कार्यालये आहे. या कंपनीकडं 358 (5) पेटंट आहेत जी 150 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत. कंपनी ऑप्टिकल फायबर आणि केबल्स, हायपर-स्केल नेटवर्क डिझाइन, आणि नेटवर्क सॉफ्टवेअरमध्ये खास सीएसपी, टेलकोस आणि ओटीटीच्या जागतिक डेटा नेटवर्कसाठी विशिष्ट इंटिग्रेटेड सोल्यूशन बझवर्ड मागणीप्रमाणं बनवून देते. अशा क्लाऊड-नेटिव्ह सॉफ्टवेअर-डिफाईन्ड नेटवर्कचे डिझाइन, बांधकाम आणि व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीनं जागतिक दूरसंचार कंपन्या, क्लाउड कंपन्या, नागरिकांचे नेटवर्क आणि मोठ्या उद्योगांसह भागीदारी केली आहे. भारत, इटली, चीन आणि ब्राझीलमधील नेक्स्ट-जनरल ऑप्टिकल प्रीफॉर्म, फायबर आणि केबल उत्पादन सुविधा आणि दोन सॉफ्टवेअर-डेव्हलपमेंट सेंटरसह त्याची जागतिक पातळीवर उपस्थिती आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया पुढाकारास चालना देण्यासाठी कंपनीनं अलीकडंच भागीदारांच्या परिसंस्थेसाठी असणारी 5 जी मध्ये गुंतवणूक केली आहे.

बाजारमूल्य : 5550 कोटी रुपये. 

विक्रीवृद्धी दर : 28.16 टक्के

(मागील तीन वर्षांची सरासरी)

नफावृद्धी दर : 125 टक्के

(मागील पाच वर्षांची सरासरी)

सरासरी लाभांश : 22 टक्के.

लक्ष दुसर्‍या तिमाही निकालांकडे

मागील अनेक वर्षांत वायदेबाजारातील सौदेपूर्तीच्या दिवशी जेवढा बाजार पडला नाही इतका बाजार या महिन्यातील या विशिष्ट दिवशी पडला. बँकिंग, आयटी, टेलिकॉम, फार्मा अशा सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली, कारण होतं की यूरोपांत कोरोनाबाधितांच्या वाढत्या केसेस व त्यामुळं तेथे लॉकडाऊन लागू शकेल ही भिती. परंतु ही भीती वायफळ ठरवत बाजारानं आठवड्यातील शेवटच्या दिवशी चौफेर खरेदीनं गुरुवारच्या सर्व पडझडीची कसर भरून काढली असली तरी गेल्या आठवड्यात निफ्टी 455 अंशांनी तर सेन्सेक्स 1457 अंशांनी खालीच आहेत. भारतातील पहिल्या मेट्रोच्या कंत्राटासाठी नागार्जुन कन्स्ट्रक्शन व एल अँड टी या कंपन्यांनी बोली लावली असल्यानं हे शेअर्स चर्चेत राहिले. वेदांता निफ्टी निर्देशांकामधील चढा शेअर राहिला तर इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स 19 टक्क्यांनिशी सर्वात जास्त पडझड नोंदवलेला शेअर ठरला. 25 सप्टेंबरपासून झी टेली व भारती इंफ्राटेल या कंपन्या निफ्टी 50 या निर्देशांकामधून बाहेर पडल्या तर त्यांच्या जागी डिव्हीज लॅब व एसबीआय लाईफ यांचा समावेश झाला. पुढील आठवड्यासाठी निफ्टीसाठी 11250 ही प्रतिकारपातळी तर 10900 ही आधारपातळी विचारात घेता येऊ शकते. पुढील आठवड्यानंतर कंपन्यांचे दुसर्‍या तिमाहीनंतरचे निकाल जाहीर होतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेबाबतचं सत्य खर्‍या अर्थानं समोर येईल. 

सुपर शेअर : रूट मोबाइल

मागील आठवड्यातच नोंदणीकृत झालेला ह्या कंपनीचा शेअर नोंदणीच्याच दिवशी भरभक्कम म्हणजे 108 टक्के वरती उघडला. 345 रुपये या भावात असलेला शेअर तब्बल 988 रुपयांवर गेलाय. गोल्डमन सॅक्स या जागतिक गुंतवणूकदार कंपनीनं 24.09 लाख शेअर्सची जादाची गुंतवणूक या कंपनीत केली असल्यानं व कुवेत इन्व्हेस्टमेंट ऍथॉरिटी फंड या संस्थेनं देखील या कंपनीच्या पावणे आठ लाख शेअर्सची खरेदी केली असल्यानं या शेअरच्या तेजीला उधाण आलंय. रूट मोबाइल हा एक आघाडीचा क्लाऊड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म प्रदाता आहे जो इंटरप्रायझेस, ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लेअर आणि मोबाइल नेटवर्क ऑपरेटर (एमएनओ) यांच्या गरज पुरवतो. कंपनीच्या एंटरप्राइझ संप्रेषण सेवांच्या श्रेणीमध्ये मेसेजिंग, व्हॉईस, ईमेल आणि एसएमएस फिल्टरींग, ऍनालिटिक्स आणि कमाईमधील स्मार्ट सोल्यूशन्सचा समावेश आहे. अशी ही 5300 कोटींचे बाजारमूल्य असणारी मुंबईतील कंपनी असून ज्याकडं मोठमोठ्या गुंतवणूकदार कंपन्या आकर्षित झालेल्या पाहतो आहोत.

-प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpfinvest@gmail.com

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply