
पाली, पेण : प्रतिनिधी
मराठा आरक्षण स्थगिती उठवावी आणि विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सुधागड पालीसह जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला होता. जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधात मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.
शासनाने पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणानुसार काय निर्णय घेणार हे जाहीर करावे, या मागण्याचे निवेदन मराठा समाजाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष यांच्याकडे देण्यासाठी रायगड जिल्ह्यात मराठा समाज तहसील कार्यालयासमोर एकवटला होता.
तसेच पेणमध्ये देखील हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये विशेष करून मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्याप्रमाणे रोहा – तांबडी येथील आरोपींना फाशी द्यावी, एसइबीसी प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुरू ठेवाव्यात, बाधित झालेल्या राज्यसेवेतील उमेदवारांना शासन सेवेत सामावून घ्यावे, नवीन कर्ज प्रकरणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, आंदोलनातील निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, पदोन्नती अरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाच्या वतीने पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.