नवी मुंबई : बातमीदार – राज्य सरकारने नुकताच मुंबई बाहेरील टोलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक घडी विस्कळीत झालेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविराधात मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी मनसेचे कामगार नेते मनोज चव्हाण, ऐरोली उपशहराध्यक्ष निलेश बाणखेले, बाळासाहेब शिंदे आणि सर्व पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात नागरिकांची आर्थिक वाताहत झालेली आहे. त्यात उद्योग धंदे, व्यवसाय बंद असून नागरिक हताश झाले आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या जनतेला राज्य सरकारने टोल वाढवून झटका दिला आहे. अनलोकला सुरुवात झालेली असल्याने पुन्हा नागरिक आपापल्या नोकरी धंद्यांवर जाऊ लागले आहेत. रेल्वे सेवा बंद असल्याने व परिवहन सेवांमधील गर्दी पाहता अनेक नागरिक स्वतःची वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. आर्थिक संकटाने पिचलेल्या जनतेला राज्य सरकारने दिलासा देण्याऐवजी टोल वाढ करून जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप देखील यावेळी मनसेने केला. आधीच वाढीव वीज बिल पाठवून जनतेचा रोष ओढवरून घेतलेल्या राज्य सरकारने टोल दार वाढवून आगीत तेल ओतल्याचा प्रकार केल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले.
या वेळी महिला व तरुण कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेत मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी पुरुष पदाधिकार्यांसह महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.