Breaking News

खोपोलीत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार

34 जणांना अटक, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
कोंबड्यांच्या पायाला धारदार हत्यार लावून त्यांची झुंज खेळवून चालणारा जुगार खोपोली पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला असून, याप्रकरणी 34 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चार लाख 31 हजार 195 रुपये रोख रक्कम, 18 हजार 700 रुपयाची दारू, 66 लाख 90 हजार किमतीची वाहने असा एकूण 71 लाख 78 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल आणि 76 फायटर कोंबडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना खोपोलीतील गगनगिरी आश्रम परिसरात असलेल्या तेज फार्महाऊसमध्ये धनाढ्यांचा कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार चालत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. घार्गे यांनी दिलेल्या, आदेशानुसार शुक्रवारी (दि. 4)रात्री पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. कराड, स्वप्निल सावंत यांच्या पथकाने छापा टाकला, त्यावेळी मद्यपान आणि कोंबड्यांच्या पायांना धारदार हत्यार बांधून झुंजी रंगात आल्या होत्या. त्यावर जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून सर्वांची पळापळ झाली. मात्र पोलिसांनी पळून जाणार्‍या 34 जणांची धरपकड केली. यावेळी 24 वाहने, झुंजीसाठी आणलेले फायटर जातीचे 76 कोंबडे, विदेशी दारू साठा व रोख रक्कम असा एकूण 71 लाख 78 हजार 195 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक आणि जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घाग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपअधीक्षक संजय शुक्ला, खोपोली पोलीस ठाण्याचे शिरीष पवार, खालापूर पोलीस ठाण्याचे बाळा कुंभार उपस्थित होते.

 

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply