पोलादपूर : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले 10 हजार कोटींचे पॅकेज अपुरे असून, ही मदत शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकर्यांकडे असलेली जमीन धारणा अत्यल्प आहे. परिणामी शेतकर्यांपर्यंत गुंठ्याला 100 रुपये मदत जरी पोहोचली तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी 50 रुपये जातील. शेतकरीवर्ग महाआघाडी सरकारकडे भरीव नुकसानभरपाईची अपेक्षा धरून बसला होता, मात्र राज्यातील शेतकर्यांना बांधावर जाऊन निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांच्या तुलनेत भ्रमनिरास करणारी ही घोषणा आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्या वेळी ते प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलत होते. दरेकर यांच्यासमवेत भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहर अध्यक्ष राजा दिक्षित, एकनाथ कासुर्डे, निलेश चिकणे, महेश निकम, समीर सुतार, माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे, राजू धुमाळ, नारायण साने, महाड अध्यक्ष जयवंत दळवी, तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते, मात्र या महाआघाडी सरकारने घोषणा करायची म्हणून केली आहे. या घोषणेने शेतकरी आपल्या दु:खातून बाहेर पडणार नाही. लाखो एकर जमिनी बाधित झाल्या आहेत हे लक्षात घेऊन जे पॅकेज निवडणुकीपूर्वी कोरडवाहूला 25 हजार, बागायतीला 50 हजार आणि फळपिकाला एक लाख रुपये असे जाहीर केले होते त्याची वचनपूर्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पॅकेजने होणार नाही. 10 हजार कोटींच्या पॅकेजमधील रस्ते, पूल व अन्य पायाभूत सुविधांसाठी जो निधी जाईल तो पाहता शेती व फळपिकासाठी केवळ पाच-साडेपाच हजारांची मदत होऊ शकेल. त्यामुळे ही पॅकेजची घोषणा शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकर यांनी पोलादपूर विश्रामगृहात प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार दिप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई यांना तालुक्यातील शेतीवर अवलंबून असणार्या कुटुंबांची संख्या, त्यांची शेतजमीन आणि अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान यांच्या संदर्भातील टिपणी करून पाठविण्यास सांगितले. परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी एक लाख पाच हजार हेक्टर भातपिकाची लागवड केली जाते. यंदा 95 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडला, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भातपीक जोमात आले होते. यंदा जिल्ह्यातील भाताचे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा शेतकर्यांना होती, मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक नष्ट झाले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच राज्य सरकारने जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे.