पनवेल : वार्ताहर
पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणार्या अधिकारी व कर्मचार्यांनी एका मोठ्या गुन्ह्यामध्ये सखोल तपास करून सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल ऐन दिपावलीच्या पहिल्या दिवशी पोलीस महासंचालकांतर्फे प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा 3 ऑगस्ट 2019 रोजी दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच आयुक्त संजय कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उप आयुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास व विश्वासघात करून अपहार केलेली वाहने हस्तगत करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे तात्कालीन वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी उपनिरीक्षक सुनिल मालु तारमळे व हवालदार रविंद्र राऊत, विजय आयरे व शिपाई यादवराव घुले यांनी या आरोपी नामे सतिश पांडुरंग म्हसकर (32, रा. मु.जाताडे, पो. रसायनी, ता. पनवेल, जि.रायगड) यास त्याच्या पनवेल येथील कार्यालयातून ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली.
चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर साथीदार शाहरूख शहानवाज बेग (25, रा. मोमीनपाडा एमजी रोड, पनवेल), चेतन मंगेश ठाणगे (26, रा. पांडूरंग कृपा लाईन आळी, पनवेल), प्रियेश पांडुरंग कणगी (40, रा. अदिनाथ शेलार माळा, कात्रज कोंडवा रोड, पुणे, मुळ रा. मुरूड, जि.रायगड) यांचा सुध्दा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनादेखील अटक केली.
वरील नमुद गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अटक आरोपीकडे तपास करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यपुर्ण वापर करुन आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वासघात करून अपहार केलेल्या एकुण 3,07,80,000 रूपये किंमतीच्या एकुण 68 वेगवेगळया कंपनीची वाहने नवी मुंबई, मुंबई, पेण, अलिबाग, व रायगड परिसरातून अहोरात्र अथक परिश्रम करून हस्तगत केल्या आहेत.