नवी मुंबई : बातमीदार
भारतात जरी कोकणचा राजा हापूसला मागणी असली तरी, परदेशी आंबे देखील बाजारात येऊ लागले आहेत. त्यापैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पिकलेल्या मलावी हापूस नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दाखल झाला. याआधीच एपीएमसीत स्पेन आणि ब्राझीलचा आंबा दाखल झाला आहे.
दरवर्षी कोकणातून एपीएमसी बाजारात व एपीएमसीतून देशात तसेच परदेशात कोकणातील हापुस आंबा विक्रीसाठी पाठवला जातो. आंब्याचे अस्सल खवय्ये हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र हापूसचे आगमन होण्यात तीन महिन्यांचा कालावधी असला तरी खवय्यांच्या जिभेची चव पूर्ण करण्यासाठी हापूस सारखाच असलेला मलावी हापूस देखील तितकाच प्रसिद्ध होऊ लागला आहे. त्यानुसार या मलावी आंब्याचे आगमन बुधवारी एपीएमसीत झाले असून पंधराशे पेटी दाखल झाल्या आहेत. जवळपास 700 ते 900 रुपये डझन ने विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे. आफ्रिकेच्या मलावीमधील 600 हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. नऊ वर्षांपूर्वी रत्नागिरीमधून 40 हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावीत नेण्यात आल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने व मातीचा पोत देखील तसाच असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला चांगली फळे आली आहेत. त्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे पुढील एक वर्ष आफ्रिकन हापूस एपीएमसीमध्ये आवक सुरू राहणार आहे. रोज 1500 पेट्या हापूस आंब्याची आवक होणार आहे.
गतवर्षीप्रमाणे एपीएमसी बाजारात यंदाही 1500 पेट्या मलावी आंबा दाखल झाला आहे. हा आंबा दिसायला, आकाराला व चवीला हापूस आंब्यासारखाच आहे. त्यामुळे ग्राहकांना नक्कीच आवडेल.
-संजय पानसरे, व्यापारी, एपीएमसी फळ मार्केट