Breaking News

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त; आमदार किसन कथोरे यांचा आरोप

अलिबाग ः प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट व नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे कमी म्हणून की काय अतिवृष्टीबाधित आणि वादळग्रस्तांना अत्यल्प मदत देऊन राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप भाजप नेते आमदार किसन कथोरे यांनी केला. ते सोमवारी (दि. 22) अलिबागमध्ये आयोजित भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करण्यात आली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांत राज्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी आणि पूरपस्थितीला सामोरे जावे लागले. यानंतर सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यातील सात हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी, तर तीन हजार कोटी पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी होते. म्हणजे अतिवृष्टीबाधितांसाठी केवळ 1500 कोटींची तातडीची मदत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला. महाराष्ट्रात जवळपास 50 लाख हेक्टरवरील शेतीला अतिवृष्टीचा फटका बसला. पिके नष्ट झाली. जमिनी खरवडून निघाल्या. जनावरे वाहून गेली. घरेही पडली, पण मदत द्यायची वेळ आल्यावर राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली. पीकविम्याची रक्कमही शेतकर्‍यांना मिळाली नाही. राज्य सरकारचे धोरण हे विमा कंपन्यांना धार्जिणे आहे असा आरोप करून विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला नको म्हणून राज्य सरकार विधिमंडळाचे अधिवेशन चालवायला तयार नाही. सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेले नाहीत. जनतेला भेटायला, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला त्यांना वेळ नाही. आघाडी सरकारने जनतेचा पुरता अपेक्षाभंग केला असल्याची टीका आमदार कथोरे यांनी केली. राज्य सरकारने मद्यावरील कर कमी केले आहेत, पण इंधनावरील कर कमी करायला हे तयार नाहीत. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते. जनतेने नेमक्या कुठल्या टाक्या फुल करायच्या, असा सवाल आमदार कथोरे यांनी केला. राज्यात एसटी कर्मचारी सध्या विलिनीकरणासाठी संप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. असे असले तरी एसटी कर्मचार्‍यांच्या या लढ्यात भाजप पूर्ण ताकदीने कामगारांसोबत राहील. या कर्मचार्‍यांची मागणी रास्त असून त्यावर राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा, असे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply