पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील वावंजे गावाजवळील हाजीमलंगच्या पायथ्याशी एका अनोळखी महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 असून, तिचा गळा ओढणीने आवळून, तसेच तीला गंभीर जखमा करून मारण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेचा बांधा मजबूत, उंची अंदाजे पाच फूट, रंग सावळा असून, अंगात लाल रंगाचा कुर्ता, पिवळ्या रंगाची सलवार व ओढणी घातलेली आहे, तसेच तिच्या डाव्या हातात काळ्या रंगाचा पट्टा असलेले घड्याळ आहे. आरोपीने या महिलेची हत्या करून तिला वावंजे मानपाडा कातकरवाडी येथील हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी टाकून दिले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.