Breaking News

मारूती पाटील यांची शिवजयंतीला सायकल भ्रमंती

अलिबाग : प्रतिनिधी

अंगात भगवे कपडे…सायकलला मागे-पुढे भगवे झेंडे आणि ध्वनिक्षेपकावर शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे ऐकवित अलिबाग-रेवस रस्त्यावरून निघालेला एक सायकल स्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मारूती लक्ष्मण पाटील (45) असे या शिवभक्ताचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील सारळ-आदिवासी वाडी हे मारूती पाटील यांचे गाव. गेली 27 वर्षे मारूती पाटील शिवजयंतीच्या निमित्ताने  सायकल भ्रमंती करून शिवरायांप्रती असलेली आपली श्रध्दा अशा अनोख्या पध्दतीने व्यक्त करीत आहेत. लहानपणापासून शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदरभाव असल्याचे सांगत मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून न चुकता शिवजयंतीला सायकलवरून तालुक्यात भ्रमंती करीत असल्याचे ते म्हणाले.  शनिवारी सकाळी 9 वाजता आपल्या सारळ गावातून त्यांनी सायकलला पँडल मारले. अलिबाग-कार्लेखिंड-कुर्डूस असा हा काही किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून केला. त्यांची ही अनोखी भ्रमंती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

शनिवारी तिथीनुसार सर्वत्र शिवजयंती साजरी झाली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; पण मारूती पाटील यांची ही अनोखी शिवभक्ती  सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply