Breaking News

देहव्यापारातील विदेशी तरुणी ‘काळ्या यादीत’

नागपूर ः प्रतिनिधी

शहरातील विविध भागांत दिवसेंदिवस देहव्यापार फोफावत असून आता या क्षेत्रात विदेशी तरुणींचाही शिरकाव झाला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावर देशात येणार्‍या विदेशी तरुणी देहव्यापार करीत असल्याची धक्कादायक बाब अनेक प्रकरणांमधून समोर आली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा त्यांना भारताचा व्हिसा मिळणार नाही याकरिता ‘काळ्या यादी’त (ब्लॅक लिस्टेट) टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

देहव्यापारासाठी पूर्वी गंगा जमुना ही एकच वस्ती कुप्रसिद्ध होती, पण सध्या शहरातील उच्चभ्रू वस्तीपासून ते गल्लीबोळातील सलून, स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचे अनेक अड्डे सुरू झाले आहेत. सामाजिक सुरक्षा विभागातर्फे गोपनीय माहिती मिळवून अशा आलिशान अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत. दुसरीकडे देहव्यापारात उच्चशिक्षित घरातील महिला, उच्चशिक्षण घेणार्‍या व घरापासून स्वतंत्र राहणार्‍या तरुणीही स्वेच्छेने येत असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या विविध कारवायांमधून समोर आले आहे. या व्यवसायातील पैसा बघून अनेक दलाल आता विदेशी तरुणींना आमिष दाखवून शहरात बोलावून घेत आहेत. रशिया, कझागिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ आदी देशांतील तरुणी नागपुरात येत आहेत.

गेल्या काही वर्षांतील पोलिसांच्या कारवायांमध्ये विदेशी तरुणी मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. वर्षभरापूर्वी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व सीताबर्डीतील एकाच कंपनीच्या हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना पकडण्यात आले होते, मात्र त्यांना पीडित म्हणून सोडण्यात येते. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अनेक विदेशी तरुणी स्वेच्छेने या व्यवसायात उतरलेल्या असून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याने त्यांचा व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणे व भविष्यात पुन्हा त्या भारतात येऊ नये याकरिता त्यांचे नाव ‘काळ्या यादीत’ टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विदेशी तरुणींना आणणार्‍यांमध्ये शहरातील काही दलालांची नावे समोर आली आहेत. यात शिवाजीनगर परिसरातील कुख्यात सचिन सोनारकर, जरीपटक्यातील मोनू, काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटून आलेला बंटी, मनीषनगर येथील जयस्वाल नावाची महिला आणि गड्डीगोदाम परिसरातील जॉन यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply