पनवेल : वार्ताहर
रायगड जिल्ह्यात एकमेव पनवेल महापालिका असलेल्या क्षेत्रात गेल्या 10 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. पनवेलमधून शासकीय आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी थेट अलिबागला नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी 60 किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. म्हणूनच पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण पनवेल करिता स्वतंत्र प्रयोगशाळा राज्य सरकारने सुरू करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. मार्च महिन्यापासून कोरोना ची लाट संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेली आहे. विशेषता भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाविषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले. मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या महानगरांमध्ये हीच स्थिती होती. विशेषता मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलचा विचार करता. ही कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून ओळखली जाते. या परिसरात स्थलांतरित लोकवस्ती हि मोठ्या प्रमाणात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये जिल्हा कोविड हॉस्पिटल पनवेल ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले होते. त्यानंतर एमजीएम हॉस्पिटललाही तो दर्जा देण्यात आला. खाजगी कोविड हॉस्पिटल सुद्धा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटीजनची चाचणी करण्याची सोय सुरू असली तरी आरपीसीआर ही चाचणी अंतिम आणि महत्त्वाची असते. पनवेलला एकही शासकीय प्रयोगशाळा नाही. त्यामुळे खाजगी लॅबमध्ये पैसे देऊन चाचण्या कराव्या लागतात. पनवेलला मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असताना राज्य सरकारने अलिबाग येथे प्रयोगशाळा सुरू केली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नमुने थेट अलिबाग या ठिकाणी घेऊन जावे लागत आहेत. त्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. रस्ते ठीक नसल्याने नमुने पोचण्यासाठी विलंब होत आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नमुने जमा करून ते क्रमांक तीनच्या केंद्रामध्ये एकत्रित करण्यात येणार आहेत. तेथून महापालिकेच्या गाडीने जमा केलेले नमुने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी पाठवले जाणार आहेत. 60 किमी अंतर कापून नमुने सामान्य जिल्हा रुग्णालयात पोचवावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब लागणार असल्याने अहवाल येणार कधी असा प्रश्न भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारचे दुर्लक्ष
पनवेल महानगरपालिकेकडे राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कोरोनाने थैमान घातलेले असताना येथील मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून पाठ दाखवण्यात आली आहे. प्रयोगशाळा हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. पनवेल महापालिका क्षेत्रासाठी चाचण्या करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करावी अशी स्थानिक नगरसेवक म्हणून आमची न्याय मागणी आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नक्कीच पाठपुरावा केला जाईल, असे भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा म्हणाले आहेत.