पनवेल : वार्ताहर
तळोजा रेल्वे फाटकावर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक प्रदीप पोळ यांनी पाहणी केली. भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश अभियंता विभागाला दिले. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजुने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तळोजा रेल्वे फाटक शेजारी 50 कोटीहून अधिक रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने 50 हॉर्स पॉवरचे एक आणि 25 हॉर्स पॉवरचे दोन पंप तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्यास आपत्कालीन परिस्थितीसाठी 200 केव्हीचा जनरेटर या ठिकाणी सज्ज ठेवले आहेत. असे असतानादेखील तळोजा भुयारी मार्गात तीन ते चार फुटापर्यंत पाणीतुंबल्याने रहिवाशांना थेट तीन किलोमीटर मीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक मार्गे ये-जा करावे लागल्याने पेंधर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रहिवाशांनी याची तक्रार मध्य रेल्वेकडे केली होती. तक्रारीची दखल घेत भुयारी मार्गात सिमेंट काँक्रीटच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे रेल्वेकडून केमिकल टाकून बंद करण्यात येत आहे. पाहणीच्या वेळी प्रदीप पोळ यांनी भुयारी मार्गात पावसाचे पाणी येऊ नये या विषयी काळजी घावी. तसेच या वेळी पेंधर रेल्वे फाटकवर दुसर्या बाजूने उभारण्यात आलेल्या रेल्वे फाटकवर सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे फाटक लवकर उभारण्यात यावे, असे निर्देश पोळ यांनी अभियंता विभागाला दिले.