Breaking News

शेअर बाजाराचा 25 वर्षांचा लेखाजोखा

अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. त्यामुळे 25 वर्षांचा हा लेखाजोखा महत्त्वाचा ठरू शकतो.
परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. असं पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे. याच ज्ञानावर एक गुंतवणूक सेवा देणारी एक अग्रगण्य कंपनी भर देऊन आपला व्यवसाय विस्तार केलेली आढळून येईल. 1987 मध्ये मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल या जोडगोळीनं आर्थिक सेवा देणारी कंपनी चालू करण्याचं ठरवलं आणि नव्वदीच्या दशकापासून त्यांचं एकच घोषवाक्य आहे, ‘Knowledge First’ (ज्ञान सर्वप्रथम). तेव्हापासून आजपर्यंत मोतीलाल ओसवाल ही कंपनी आपल्या रिसर्चसाठी प्रसिद्ध आहे. शेअरबाजार म्हणजे एका मोठ्या दर्यासारखा आहे. जो तो आपल्या परीनं याचा थांग घ्यायचा प्रयत्न करत असतो. कोणी त्यात यशस्वी होतं तर कोणी गटांगळ्या खातो. परंतु, यासाठी समर्पित वृत्ती, अभ्यास व नशीब ह्या गोष्टी असल्यास यश प्राप्तीची खात्री बाळगता येऊ शकते. मागील 25 वर्षे मोतीलाल ओसवाल ही कंपनी नित्य नेमानं दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ’वेल्थ
क्रिएशन स्टडी’ या नावानं मागील वर्षांतील कंपन्यांचा आढावा व भविष्यातील गुंतवणुकीसाठी काही कंपन्या सुचवत असतात. मागील आठवड्यातील त्यांच्या 25व्या वेल्थ क्रिएशन स्टडीचा लेखा-जोखा.
काही ठळक गोष्टी
 1995 साली नोंदणीकृत असलेल्या सर्वोच्च 500 कंपन्यांमधून केवळ 100 कंपन्यांनीच मापदंडापेक्षा सरस कामगिरी बजावली आहे.
 भविष्याच्या गर्भात नेहमीच अनेक वचनं दडलेली असतात.  आताच्या एकूण बाजारमूल्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक बाजारमूल्य हे 1995 नंतर नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांचं आहे.
 इक्विटी गुंतवणूक गुंतागुंतीची आहे. त्यामुळं अशा प्रक्रियेत शिस्त आणण्यासाठी चेकलिस्ट हे एक उत्कृष्ट साधन आहे.
 या लेखातले काही मोजके प्रश्न आणि त्यासंबंधित चौकट याने गोष्टी प्रत्येक गुंतवणूकदारास वेळोवेळी स्वत:ची चेकलिस्ट तयार करण्यासाठी एक चांगला प्रारंभबिंदू ठरतील.
1995 ते 2020 या काळात, मार्च 1995 मध्ये सेन्सेक्स 3200 च्या पातळीवरून वाढून मार्च 2020 पर्यंत 29500 वर आला म्हणजेच संयुक्तिक सरासरी वाढीचा दर (CAGR) हा 9.2% झाला. विशेष म्हणजे, केवळ 100 कंपन्यांनीच यापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. यास 100 शीघ्र जलद संपत्ती निर्माते म्हटलं गेलंय (इन्फोसिस), त्यांमधील क्रमवारीत सर्वांत वरील स्थानी असणार्‍यांना सर्वांत मोठे संपत्ती निर्माते (रिलायन्स इंडस्ट्रीज) म्हटलं गेलंय. 1995 पासून 2020 पर्यंत तीन वर्षांचे रोलिंग कालावधी काढले (1995-1998, 1996-1999…) तर असे कालावधी 23 भारतात, अशा 23 पैकी सर्वांत जास्त वेळा (नियमित) संपत्ती निर्मिती क्रमवारीत येणार्‍या क्रमवारीस नियमित संपत्ती निर्माते (कोटक महिंद्रा) म्हटलं गेलंय.
आश्चर्याची बाब म्हणजे, 1995 मधील सर्वोच्च बाजारमूल्य असणार्‍या पहिल्या 100 कंपन्यांपैकी सुमारे 60 कंपन्या ह्या आताच्या संपत्ती निर्मितीच्या यादीमध्ये स्थानदेखील मिळवू शकलेल्या नाहीत कारण त्यांचा संयुक्तिक सरासरी वाढीचा दर (उअॠठ) हा मापदंड म्हणजे बेंचमार्क सेन्सेक्सच्या परताव्यापेक्षा (9.2% सीएजीआर) कमी आहे. 1995 सालातील सर्वोच बाजारमूल्य असलेली कंपनी स्टील ऍथोरिटीचा मागील 25 वर्षांतील CAGR आहे उणे 2%.
काही महत्त्वाचे टप्पे
 सर्वांत जास्त इक्विटी परतावा : हिंदुस्थान युनिलिव्हर (68% सरासरी  ROE).
 सर्वांत जास्त करोत्तर नफा : इन्फोसिस (33% सरासरी).
 नफ्यातील सर्वांत जास्त वाढ : रिलायन्स इंडस्ट्रीज (97.6% सरासरी).
 सर्वांत जास्त विक्रीमधील वाढ : रिलायन्स इंडस्ट्रीज (99.4% सरासरी).
 सर्वांत जास्त पुस्तकी मूल्यातील वाढ : इन्फोसिस (31%).
 सर्वांत जास्त सरासरी लाभांश (अब्ज रु.) : आयटीसी (708).
 सर्वांत कमी बाजारमूल्य ते तुलनेनं जास्त (मिनी टू मेगा) : हॅवेल्स इंडिया (0.2 अब्ज ते 300 अब्ज रु.).
 वर उल्लेखल्याप्रमाणं गुंतवणूक करण्यासाठी कंपनीची निवड करताना चेकलिस्ट बनवण्यासाठी काही गोष्टी :
 कंपनीचा व व्यवस्थापनाचा इतिहास – सूचना : गुणवत्ता, योजनाबद्धता, व्यवस्थापनाची व्यवसायातील विश्वासार्हता, सहभाग, दखल, वृद्धीतृष्णा, कटिबद्धता, गहाणबद्धता, कसोटीवर उतरलेल्या जुन्या त्या उत्तम.  
 कंपनीचा व्यवसाय – समजण्याजोगा, नवीन टेक्नॉलॉजी व नवीन प्रकारच्या मागणीस धरून.
 नफा – नियमित / उत्तम / ठीकठाक / घातक यांची पडताळणी.
 कंपनीचे व्यवहार – कर्ज, व्याज, उत्पादन आयुष्य, ग्राहक हाताळणी.
 ड्यू पॉन्ट ऍनालिसिस – 2020 करोत्तर नफा मार्जिन्स 2015; 2020 साधनसंपत्तीचा वापर आणि त्याचं नफ्याशी गुणोत्तर 2015, कर्ज व इक्विटी गुणोत्तर एक पेक्षा कमी.
 अंतर्गत व बाह्य स्पर्धा – उत्पादनाची वैशिष्ट्ये/खासियत, नफ्याच्या मार्जिन्सचं दीर्घायुष्य.
 व्यवसायातील संधी – ऋणमुक्त भांडवली खर्च, खर्च करण्यासाठीची सूज्ञता व खर्चावरील नियंत्रण.
 व्यवसायवाढ -नवलाई, स्थिरता, तग व आयुष्य.
  मूल्यांकन सिद्धता – समव्यवसाय पडताळणी.
 मार्जिन ऑफ सेफ्टी – अर्थार्जन मूल्य – व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग – बेंजामिन ग्रॅहम.  
 तरलता – कोणत्याही क्षणी खरेदी-विक्रीस सुलभता.
वरील लेखाजोखाव्यतिरिक्त गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये चाणाक्ष राहून स्वतःच्या अभ्यासानं गुंतवणूक केल्यास मिळणारं
समाधान हे, परताव्यातून मिळणार्‍या आनंदापेक्षा  उजवं ठरू शकतं याबाबत दुमत नसावं.
सध्याचं बाजारमूल्याचं जीडीपीशी गुणोत्तर हे 100 आहे, जे 2008 साली 103 होतं. ही गोष्ट बाजारासाठी धोक्याची ठरू शकते. तरीही, कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे सध्या आपल्या देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) प्रमाणात सर्वांत कमी आहेत. मागील 25 वर्षांची सरासरी आहे 3.2 टक्के आणि 2020 मधील टक्केवारी आहे, 2.3%. म्हणजेच आता अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. यासंबंधी पुढील लेखात. 

  • प्रसाद ल. भावे (sharpadvisers@gmail.com)

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply