यंदाचे अवघे वर्षच लसीकरणाच्या अवाढव्य कार्यक्रमात निघून जाणार आहे यात शंका नाही. जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस शोधण्यात यश मिळाले आहे म्हणजेच एका अर्थाने या महाघातक आजारावरील उपाय हाती आला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या तब्बल 137 कोटींहून अधिक आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येला लसीचे दोन-दोन डोस देणे हे आभाळाएवढे प्रचंड काम आहे. म्हणूनच या कार्यक्रमाला जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असे संंबोधले जात आहे.
गेल्या वर्षभरातील अनुभव पाहता नवनव्या आव्हानांची आपल्याला आता सवयच झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये कोरोना विषाणूच्या थैमानामुळे एक जीवघेणे महासंकट देशापुढे उभे ठाकले. यातून अर्थव्यवस्थेचीही दुर्दशा उडाली. भरीस भर म्हणून चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांनी सरहद्दीवर नवे आव्हान उभे केले. या सार्या आघाड्यांवर शर्थीने झुंजत असताना विरोधी पक्षाच्या बेजबाबदार वर्तनामुळे देशांतर्गत परिस्थितीही अवघड बनत गेली. तेही आव्हान पेलावे लागले. परंतु त्याबाबत तक्रार करण्यास जागा नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ असे म्हणून गप्प बसायचे. आव्हानांचे ढग असे जमलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अहोरात्र काम करत राहिले. या सर्व आव्हानांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले. आव्हानांचे डोंगर कोसळले तरी पंतप्रधान मोदी त्यातून अचूक मार्ग काढत देशाला प्रगतीपथावर दौडवत ठेवतील असा ठाम विश्वास सार्यांना वाटतो. ते स्वाभाविकच आहे. कारण भारतवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व समर्थ ठरले आहे. गेले वर्ष कोरोना विषाणूशी झुंजण्यात गेले. यंदाच्या वर्षी देशासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते राष्ट्रीय पातळीवरील लसीकरणाचे. भारतासारख्या विशाल देशामध्ये खेड्यापाड्यात राहणार्या नागरिकांना, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आणि भगिनींना तसेच शहरवासियांनाही कोरोना विषाणू प्रतिबंधक लस टोचण्याचे आव्हान इतके प्रचंड मोठे आहे की त्याचे स्वरुप एका दृष्टिक्षेपात लक्षात येणे शक्य नाही. खेरीज ही संपूर्ण लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करावी लागणार आहे. तरीही त्यासाठी काही वर्षे लागतील असे सध्यातरी दिसते. लसींचा साठा व वाहतूक हे या मोहिमेतील एक मोठे आव्हान आहे. उणे अंश सेल्सिअसमध्ये या लसीच्या कुप्या साठवून ठेवाव्या लागतात. त्यासाठी आवश्यक शीतगृहे उभी करण्याचे काम गेले काही महिने ठिकठिकाणी चालू होते. शनिवारपासून संपूर्ण देशात लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे. दररोज सरासरी किती लोकांना लस टोचता येईल? त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय असतील? लसीच्या साठवणुकीतील प्रत्यक्ष अडथळे कुठल्या स्वरुपातील असतील, ही महाप्रचंड मोहीम राबविण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा कितपत सक्षम आहे या व अशासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या रंगीत तालमीमध्ये मिळू शकतील. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची सराव फेरी पार पडेल. या रंगीत तालमींमध्ये लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. कारण ही फक्त सरकार किंवा आरोग्य यंत्रणांची जबाबदारी नाही. या कार्यक्रमामध्ये कमीत कमी अडथळे येतील याची काळजी आपणच घ्यायला हवी. किंबहुना तोच नव्या वर्षाचा संकल्प ठरावा.