नगर परिषदेच्या वतीने स्लॅप तोडण्यास सुरुवात
रोहा : प्रतिनिधी – रोहा अष्टमी नगर परिषदेने रोह्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून काही ठिकाणी गटारांवर दुकानदारांनी कायमस्वरूपी स्लॅप टाकल्याने त्या गटारातून सफाई कामगारांना कचरा काढता येत नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरून शहरात काही ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल रोहा अष्टमी नगर परिषदेने घेत आता हे सर्व गटारांवरील स्लप तोडण्याचे काम शनिवारपासून सुरू केले आहे. त्यामुळे रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील गटारे मोकळी होऊन वाहतील व दुर्गंधी येणार नाही.
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी भाजी मार्केट बंद करण्यात आले. रोहा शहरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी नगर परिषद सफाई कर्मचारी युध्दपातळीवर काम करीत आहेत. काही ठिकाणी सफाई कर्मचार्यांना गटारे बंद असल्याने काम करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी ठोस भूमिका घेतली असून बांधकाम विभागाचे अभियंता सुधीर भगत यांनी रोहा शहरातील ही गटारे मोकळी करण्याचे काम कर्मचार्यांना सोबत घेऊन सुरू केले आहे. रोह्यातील फिरोज टॉकिज ते दमखाडी या टप्प्यात हे काम करण्यात येत आहे.