Breaking News

‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही’

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे असे सांगत भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अस्लम शेख यांच्यावर टीका केली आहे.  ‘अस्लम शेख यांना मागील 11 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या मालाडमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण दूर व्हावी याकरिता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत, मात्र मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा यादृष्टीने सतत पाठपुरावा करीत होतो. माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी उत्तर वार्डचे विभाजन करून पी पूर्व व पी पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. या पोटशूळातून अस्लम शेख यांनी आता मुंबईसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. याआडून मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा जो डाव आहे तो भाजप कदापि यशस्वी होऊ देणार नाही आणि असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा आमदार भातखळकर यांनी दिला आहे. याचबरोबर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायमच राजकारण करणार्‍या शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्लम शेख यांच्या या वक्तव्याविषयीची भूमिका काय आहे, असा प्रश्नसुद्धा आमदार भातखळकर यांनी विचारला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply