Breaking News

पनवेलमध्ये दीक्षा अ‍ॅपची ज्ञानगंगा पोहचली घरोघरी; 85 दिवसांपासून 12 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घंटा मागील अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात बंद असली तरी येथील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी झटत आहे. दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत 85 दिवसांपासून शिक्षण सेवा सुरू ठेवण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 248 शाळा असून त्यामध्ये 21 हजार 893 विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतात. टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी दीक्षा अ‍ॅप प्रणालीने येथील 941 शिक्षकांना साथ दिली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद (एसईआरटी) दररोज जिल्हा शिक्षण संस्थेच्या अधिकार्‍यांपर्यंत शिक्षणाची लिंक पाठविल्यानंतर ही लिंक संबंधित तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत मुख्याध्यापक व शिक्षकांपर्यंत पोहचवली जाते. संबंधित वर्गाच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांंची व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमावर गट तयार करुन दररोज येणार्‍या विषयाच्या धड्याचा स्वाध्याय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला जातो.

त्यानंतर अ‍ॅन्ड्रॉइड फोन असलेल्या तालुक्यातील सूमारे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे शैक्षणिक धडे पोहचविले जातात. जिल्हा परिषदेने यापूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहच केल्याने त्या विषयाचा अभ्यास घरपोच करून त्याची उत्तरे सोडवून पुन्हा मोबाइलद्वारे दुवा (लिंक)अपलोड करणे, संबंधित शिक्षकांना त्यांच्या मोबाइलवर पाठविणे या माध्यमातून पनवेलच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांंचे शिक्षण सुरू आहे. पनवेल तालुक्यातील सुमारे 1300 विद्यार्थी हे आदिवासी भागातील असून त्यांच्यापर्यंत आणि सुमारे सात हजार इतर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत मोबाइल, इंटरनेट सेवा व पालकांची शिक्षणाबद्दलची रुची या समस्येमुळे शिक्षण पोहचू शकले नाही. अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल असलेल्या पालकांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचत असून ज्या पालकांकडे मोबाइल नाही अशा पाल्यांपर्यंत ‘दीक्षा अ‍ॅप’ पोहचणे अशक्य आहे. सध्या पनवेल शिक्षण विभागातील चेतन गायकवाड समन्वयक म्हणून काम करीत आहेत. ते या प्रक्रियेतील दुवा

ठरले आहेत.

टाळेबंदीची दूसर्‍या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी पनवेल येथील शिक्षकवर्ग 85 दिवसांपासून कामाला लागला आहे. ज्या पालकांचा अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल आहे, अशा पाल्यांपर्यंत शिक्षण पोहचत असून इतर पाल्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी समाजमाध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. आदिवासी विभागातील पाल्यांच्या पालकांकडे मोबाइलची सोय नसल्याने थोडी अडचण होत आहे. टीव्ही आणि रेडिओच्या बालचित्रवाणी वाहिनीतून सुमारे सव्वासात हजार विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे, असे पनवेलचे गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply