Breaking News

निसर्गाची अवकृपा

कोरोना महामारीतून भारत सावरत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना देशातील नागरिकांना करावा लागत आहे. सध्या देशात हिवाळा सुरू असला तरी पावसाळ्याचा अनुभव येत आहे. या ‘हिवसाळ्या’चा फटका नागरिकांना विशेषकरून शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना बसत असून, बदलत्या हवामानामुळे त्यांना सातत्याने आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी   पाऊस पडत आहे, तर जवळपास सर्वच ठिकाणी वातावरण ढगाळ आहे. ज्या मोसमात गुलाबी थंडी पडते त्या हिवाळ्यात वरुणराजा बरसत आहे. आधीच यंदा पावसाळ्याच्या उत्तराधार्थ मान्सून धो धो बरसला. महाराष्ट्रात तर पावसाची विक्रमी नोंद झाली. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासून दुष्काळ पडतो तिथे पूर आले एवढा पाऊस पडला. त्यामुळे यंदा थंडीचा कडाकाही मजबूत असेल अशी अपेक्षा होती. थंडीचा सामना करण्यासाठी लोकांनी तयारीही केली होती, मात्र हिवाळ्याचा पार विचका झालाय. हवेत गारवा आला की लगेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचे क्षेत्र आणि वार्‍यांच्या चक्रीय स्थितीमुळे वारंवार विचित्र स्थिती निर्माण होऊन थंडी गायब होत असल्याचा अनुभव येत आहे. अवकाळी पाऊस तसा आपल्याला नवा नाही. निसर्ग आपल्या लहरीपणाची रूपे अधूनमधून दाखवतच असतो. याआधीही अवेळी पाऊस पडल्याची नोंद आहे, पण हल्ली हा अवकाळी पाऊस हमखास पडू लागलाय. त्याचा त्रास सर्वांना होतो, पण सर्वाधिक फटका हा अन्नदाता बळीराजाला वारंवार बसतोय. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची नव्या जोमाने तयारी केली, मात्र मोठ्या कष्टाने शिवार फुलविण्याच्या आशा-आकांक्षांवर ‘पाणी’ फेरले जात आहे. एरवी नियमित पावसासाठी शेतकरीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. आता ‘जारे जारे पावसा’ म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. अचानकपणे जलधारा बरसत असल्याने पिकाचे रक्षण तरी कसे करायचे या विवंचनेत तमाम शेतकरी आहेत. रायगड जिल्ह्यासह कोकणातील नफा मिळवून देणारे आंबा पीक धोक्यात आले आहे. आंब्याला मोहोर आला असताना पावसात तो गळून पडत आहे. इतर पूरक कडधान्य पीकेही खराब होण्याची भीती आहे. शेतकर्‍यांबरोबरच मच्छीमार बांधवदेखील या सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. वादळांची मालिका, कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा एकापाठोपाठ एक आलेल्या संकटांनी मासेमारी करणे मच्छीमारांसाठी अवघड होऊन बसले आहे. मच्छीमार लोक हे सहकारी खलाशी आणि आवश्यक सामग्री घेऊन समुद्रात बोट घेऊन जात असतात. भरपूर मासळी मिळून झालेला खर्च सुटावा आणि दोन पैसे गाठीला राहावे यासाठी जीवावर उदार होऊन कोेळी बांधव खोल समुद्रात मासेमारीला जातात, मात्र हवामान सातत्याने कूस पालटत असल्याने त्यांना किनार्‍यावर यावे लागत आहे. परिणामी मासळी कमी आणि खर्च जास्त होऊन त्यांना आर्थिक झळ बसत आहे. आणखी एक घटक म्हणजे वीटभट्टीधारकांनाही ‘अवकाळी’मुळे नुकसान सोसावे लागत आहे. ही सारी मंडळी कर्ज काढून, उसनवारी करून हंगाम चांगला जाईल या आशेने कष्ट उपसत असतात, मात्र वाटेत नैसर्गिक संकट येत असल्याने जगायचे कसे, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. बरं निसर्गाला रोखणे कुणाच्याच हातात नाही. मानवी अतिरेक तर निसर्गाच्या या लहरीपणाला कारणीभूत नाही ना याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आली आहे हे मात्र नक्की!

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply