महाड : प्रतिनिधी
कुडपण येथील अपघातातील जखमींना सर्वतोपरिने मदत करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर शनिवारी (दि. 9) सायंकाळी महाड येथे दिले.
पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे शुक्रवारी सायंकाळी लग्नाच्या वर्हाडचा टेम्पो दरीत कोसळला होता. या अपघातात तीघे ठार तर 67 जण जखमी झाले होते. त्यातील चौघा जखमींना महाड येथील डॉ. भोसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवीण दरेकर यांनी शनिवारी सायंकाळी डॉ. भोसेकर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. जखमींची कोणतीच जबाबदारी सरकार घेत नसल्याचा टोहो या वेळी जखमींच्या नातेवाईकांनी दरेकरांसमोर फोडला.
जखमींपैकी एका महिलेला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. या गोरगरीबांच्या मागे भाजप नक्कीच उभा राहील, असे म्हणत दरेकर यांनी तात्काळ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात संपर्क साधून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन जखमींच्या नातेवाईकांना दिले. या वेळी महाड तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.