मुंबई ः प्रतिनिधी
भर अधिवेशनात राज्य सरकारचे कट-कारस्थान बाहेर काढणारे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. स्वतः फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देत केवळ सूडापोटी आपल्याला ही नोटीस पाठविल्याचा आरोप केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांचीदेखील उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, आज 12 मार्च आहे. मुंबई बॉम्बस्फोट आजच्या दिवशी झाला होता. आज तीन दशके झाल्यानंतरही त्याचे घाव आपल्या मनावर कायम आहेत. एकीकडे 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करतो. दुसरीकडे बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत, त्याबद्दल खंत व्यक्त करतो. मार्च 2021मध्ये भाजपच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेऊन मविआ सरकारचा गृहखात्यातील बदल्यांचा महाघोटाळा मी बाहेर काढला होता. त्याचे पेन ड्राईव्ह, सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. हे पुरावे मी देशाच्या गृह सचिवाला सुपूर्द करतोय हेही सांगितले होते. त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि देशाच्या गृह सचिवांकडे सर्व माहिती सादर केली. त्यानंतर त्याचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातील सर्व चौकशी ही सीबीआयला सुपूर्द केली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करतेय. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी सुरू आहे. अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत, पण राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरिता माझ्यावरच एक एफआयआर दाखल केला. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टमधली माहिती लीक कशी झाली अशा प्रकारचा हा एफआयआर आहे. या संदर्भात मला पोलिसांचे क्वेश्चनार पाठवण्यात आले. याची माहिती मी देईन, असे सांगितले होते. विरोधी पक्षनेता म्हणून ही माहिती कुठून आली असा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापि, मला पुन्हा क्वेश्चनार पाठवण्यात आले आणि कोर्टात सांगण्यात आले मी त्याचे उत्तर देत नाहीए, असा दावा फडणवीस यांनी केला. मुंबई पोलिसांनी काल मला नोटीस पाठवली आहे. या बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलावले आहे. जरी मला प्रीव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. ही सर्व माहिती मी देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे. जी माहिती बाहेर ती राज्य सरकारच्या मंत्र्यानी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. तरीही पोलीस जी काय चौकशी करतील त्याला योग्य उत्तर देणार आहे. पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरी त्यांनी तपासात माझे सहाय्य मागितले आहे ते मी निश्चितपणे देईन, असे फडणवीस यांनी सांगितले. माझा प्रश्न असा आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा सहा महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता त्या अहवालात बदल्यांची सर्व सेन्सेटीव्ह माहिती असताना त्यावर सरकारने कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालायने ही सर्व माहिती सीबीआयला दिली. न्यायालयाने सीबीआयला दिली. त्यामुळे या केसला तशीही काही अर्थ नाहीए, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारची आता जी परिस्थिती आहे, परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसातील काही अधिकारी त्यांना उत्तर सूचत नसल्याने मला नोटीस पाठवण्यात आली आहे, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मी उद्या 11 वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे सांगितले होते, मात्र आता फडणवीस उद्या बीकेसी पोलीस स्टेशनला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत खुलासा केला. ‘सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र!’ असे फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले आहे.
भाजप आज प्रत्येक जिल्ह्यात नोटिसीची करणार होळी
कोल्हापूर ः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा तीव्र निषेध करतो. रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते नोटिसीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.