पेण : प्रतिनिधी
स्वच्छता सर्वेक्षण 2021 अंतर्गत माझी वसुंधरा योजना अभियान पेण नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून शुक्रवारी (दि. 15) शहरात पथनाट्य व सायकल रॅली काढून स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली.
रॅलीचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने, बांधकाम सभापती दर्शन बाफणा, नगरसेवक अजय क्षीरसागर, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक राजाराम नरुटे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानांतर्गत पेण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा अभियानात निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून माझी वसुंधरा स्वच्छ व सुंदर, हरित व पर्यावरण पूरक राखण्यासाठी सर्वानी सहभाग घेतला पाहिजे, यासाठी शुक्रवारी जनजागृतीपर पथनाट्य व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या वेळी पथनाट्याद्वारे पेण शहरातील विविध चौकात ओला कचरा, सुका कचरा, परिसर स्वच्छता कसे ठेवावे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.