पनवेल ः प्रतिनिधी
श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. 14) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, अभियानप्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्कप्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरू होणार असून पनवेलनगरीतील संपर्क व निधी संकलन कार्यालय गंगाकावेरी सोसायटी, गोदरेज प्लाझासमोर, टिळक रोड येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाद्वारे सर्व स्वयंसेवक घरोघरी संपर्क करून नागरिकांना मंदिराची माहिती सांगण्याबरोबरच निधी संकलन करणार आहेत. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रत्येक नागरिकाने श्रीराम मंदिर उभारणीसाठी आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
500 वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या विजयातून निर्माण होणार्या भव्य मंदिराचे आपण फक्त साक्षीदार होणार नसून त्याच्या प्रत्यक्ष उभारणीत सहभाग घेणार आहोत. नुसते स्वत: सहभागी न होता संपूर्ण समाजाला यात सहभागी करण्यासाठी हे अभियान असल्याचे शरद ओगले या वेळी म्हणाले.
प्रत्येकाने आपल्या मनातील निर्गुण स्वरूपातील रामाचे जागतिकरण केले तर प्रथम आपल्या मनात त्यांचे मंदिर तयार होईल. त्यानंतर हे सगुण स्वरूपातील भव्य मंदिराचे कार्य सहजतेने पूर्ण होईल. रामनाम जपाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कृतीतून सदाचार आणि पुरुषार्थ जागृत केला तर देशाला आणि विश्वाला पुढे नेण्याचे काम आपल्या हातून होईल, असे मनोगत डॉ. ययाती गांधी यांनी या वेळी व्यक्त केले.
या मंदिराच्या निर्माणातून आणखीन एक मंदिर निर्माण होणार असे नव्हे, तर ज्या संस्कृतीचा आपणाला अभिमान आहे त्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या प्रभू राममंदिराचे निर्माण होणार आहे. या मंदिराच्या निर्माणातून आपल्या अस्मितेचे तेजस्वी रूप साकारले जाणार आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष