Breaking News

खोपोलीत कंपनी अधिकार्यावर जीवघेणा हल्ला

खोपोली : प्रतिनिधी

येथील वासरंग रस्त्यावर महिंद्रा सानयो कारखान्यात कामावर जात असताना, तेजस सुरेंद्र भाई थंडार या अधिकार्‍यावर स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लोखंडी पाइपने हल्ला केला. हल्लेखोर थंडार यांना जखमी करून लवजीच्या दिशेने पसार झाले. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडे आठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कंपनी परिसरात खळबळ उडाली.

तेजस थंडार हे महेंद्र सोनयो या कारखान्यात स्टोअर विभागाचे अधिकारी असून, गुरुवार सकाळी माऊंट या सोसायटीतून आपल्या बाईकवरून कंपनीकडे जात असताना, वासरंग रस्त्यावर स्मशानभूमीजवळ पांढर्‍या रंगाच्या ऍक्टिवा स्कूटीवरून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी रस्ता अडवून थंडार यांच्यावर लोखंडी पाइपने अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात थंडार जखमी झाले.

या क्षणी कंपनीत जाणार्‍या काही कामगारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण, त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून धमकावल्याने मदतीसाठी आलेले कामगार मागे सरकले. त्यानंतर ते तरुण लवजी गावाच्या दिशेने स्कूटीवरून पसार झाले.

दरम्यान, थंडार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर स्वरुपाच्या जखमा आहेत. गुरूवारी रात्री उशिरा त्यांना घरी सोडण्यात आले मात्र या घटनेने या परिसरात दहशत पसरली आहे

या घटनेबाबत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास हवालदार पाटील करीत आहेत.

पेण कोपर येथे हाणामारी

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील कोपर गावानजीक असणार्‍या हॉटेल समोर एकमेकांच्या गाड्या अडविल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून दोन्ही गटांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

 पहिल्या फिर्यादीत फिर्यादी (रा. हनुमान पाडा, ता. पेण) हे कोपर गावच्या हद्दीतील हॉटेल न्यू मीनल येथून जेवण करून घरी जात असताना आरोपी (रा. गडब, ता. पेण) यांची बाचाबाची झाली. फिर्यादी ती सोडवायला गेले असता आरोपी यांनी स्टम्पच्या सहाय्याने फिर्यादी यास मारहाण करून दुखापत केली. तर दुसर्‍या फिर्यादीत आरोपीने दुचाकीवर येऊन फिर्यादी यांच्या गाड्या अडवून ठेवल्याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी केल्याचे म्हटले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply