पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून, बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्यूदरदेखील वाढत असून गुरुवार (दि. 23)अखेर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे. अशात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे सात हजार 960 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
रुग्णसंख्येच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यात पाचव्या स्थानावर आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची सक्रिय संख्या तीन हजार 322 असून, यामध्ये पनवेल मनपा 1391, पनवेल ग्रामीण 510, उरण 151, खालापूर 378, कर्जत 81, पेण 398, अलिबाग 403, मुरूड 33, माणगाव 67, तळा 2, रोहा 98, सुधागड 7, श्रीवर्धन 39, म्हसळा 53, महाड 101, पोलादपूर 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
नागोठण्यात आढळले चार नवे पॉझिटिव्ह
नागोठणे : प्रतिनिधी – शहरात कोरोनाची साखळी अद्यापही तुटली जात नसून शहराच्या विविध भागात शुक्रवारी (दि. 24) नव्याने चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात मुख्य बाजारपेठेत दोन, तर ब्राह्मणआळी आणि मोहल्ला येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे आणि सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली.
माणगाव तालुक्यात दोन रुग्णांची पडली भर
माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात नगरपंचायत हद्दीतील खांदाड येथील 25 वर्षीय महिला व निजामपूर येथील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, निजामपूर येथील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.
तालुक्यात आतापर्यंत 45 गावांतून 243 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी 171 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. दरम्यान, गुरुवारी दोन नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 67 झाली आहे.