पनवेल : रामप्रहर वृत्त
निर्भीड लेखचा रविवारचा (दि. 7 एप्रिल) अंक पाहिल्यास पत्रकार (?) चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे पनवेलकरांसमोर उघड झाले आहे. बातमी एक आणि हेडलाईन वेगळीच. यावरून या पत्रकाराला ठाकूर परिवाराची किती कावीळ झाली हे दिसून येते.
निर्भीड लेखच्या बातमीमध्ये ‘त्यातच विकी देशमुख याने त्याच्या गाडीतील धारदार सुरा काढून परेश ठाकूरांच्या दिशेने वार केला, तो वार त्यांनी चुकविला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल बामगुडे यांनी दिली’ असे मजकुरात लिहिले असताना प्रत्यक्षात हेडलाईन मात्र ‘ठाकूर बंधूंची गुंडगिरी’ असे भडक व चुकीचे छापून या पत्रकाराने आपले ज्ञान पाजळले आहे.
निर्भीड लेखच्या पुढच्याच उतार्यात असे म्हटले आहे की, ‘विकी देशमुखवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत’. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाने महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांना रस्त्यात अडवून मला ओळखले नाहीस काय, असे धमकावले. त्यावरून विकी देशमुख आणि परेश ठाकूर यांच्यात बाचाबाची झाली.
विकी देशमुख हा कुप्रसिद्ध गुंड असून, दहा-बारा वर्षे त्याने तुरुंगात काढली आहेत. आता पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हप्तावसुली, दमबाजी, धमकावणे यासारखी समाजविघातक कामे सुरू केलेली आहेत, अशी चर्चा तालुक्यातील लोकांमध्ये उघडपणे सुरू असताना ‘निर्भीड’ लेखन करणार्या व सगळीकडची गुप्त माहिती काढणार्या आपल्याच वृत्तपत्राला हे माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर नगर परिषदेच्या निवडणुकीत एक क्रॉस कम्प्लेंट दाखल आहे. त्या तक्रारीत दोन्हीकडच्या बाजूच्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. ही राजकीय केस आहे. त्यामुळे अशा गुंडाची तुलना सभागृह नेते परेश ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी करून चुकीची बातमी देण्याची परंपरा निर्भीड लेखने चालूच ठेवली आहे.
‘ठाकूरजी, एकदा तरी खरे बोला’ असे विचारताना आपले वय काय आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या रामशेठ ठाकूर यांचे वय काय याचा तरी किमान विचार निर्भीड लेखच्या संपादकाने करायला हवा होता. निर्भीड लेखचे अग्रलेख दुसर्याकडून वाचून घ्यायला रामशेठ ठाकूर हे काही अशिक्षित आहेत, असे वाटते का तुम्हाला.
रामशेठ ठाकूरांच्या वाढदिवसानिमित्त सीकेटी कॉलेजमध्ये रामशेठ ठाकूर यांची रक्ततुला तुम्हीच करून घेतली होती. तेव्हा रामशेठ ठाकूर रक्ततुला करण्याएवढे चांंगले होते. आता मात्र तुमच्यालेखी ते वाईट कसे झाले? रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहातील सुधीर फडके यांच्या गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन आपणच केले होते. मग तेव्हा तुम्हाला वेड लागले होते की आता वेड लागले आहे, याचे उत्तर तुम्हीच शोधा. रामशेठ ठाकूर हे माझे विठ्ठल आणि त्यांचे घर ही माझी पंढरी, असे आपणच वरचेवर बोलत होता. याचाही आपल्याला विसर पडलेला नसावा. मग असे असताना तेव्हाचे रामशेठ आणि आताचे रामशेठ यात काय फरक झाला असे आपल्याला वाटते? या दरम्यान मधल्या काळात आपल्याला कुठे काय कमी पडले का, हे तरी एकदा पनवेलकरांसमोर जाहीर करावे. कोणताही कामधंदा नसल्यामुळे आपण अकारण ठाकूर कुटुंबीयांसंदर्भात वेगवेगळ्या बातम्या पेरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहात हे पनवेलकर जनता जाणते. तुम्हाला वादविवाद करण्यात स्वारस्य असले तरी आम्हाला मात्र मर्यादा आहेत. आम्हाला याचीही कल्पना आहे की पुढील विधानसभा निवडणुकीत आपण आपले हेच कुटील उद्योग पुन्हा सुरू ठेवणारच आहात. आम्हाला त्याची पर्वा नाही. अशा गोष्टी करणे तुम्हालाच शोभून दिसतात आणि तुम्ही त्या अवश्य करत राहा. आता जनताच तुम्हाला योग्य उत्तर देईल.