Breaking News

सडलेल्या जलवाहिन्यांतून श्रीवर्धनला पाणीपुरवठा

श्रीवर्धन : प्रतिनिधी

शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानवली धरणातून श्रीवर्धनला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ती जीर्ण झाल्याने त्यातून अनेक वेळा गंजयुक्त व शेवाळयुक्त पाणी येते, तसेच ही जलवाहिनी ठिकठिकाणी फुटण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रानवली धरणापासून श्रीवर्धन शहरापर्यंत टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी शेतामधून तसेच खाडीलगत आहे. खार्‍या हवामानामुळे ती लवकर गंजून जीर्ण झाली आहे. 29 जानेवारी रोजी ही जलवाहिनी भट्टीचामाळ येथील शेतामध्ये फुटल्याने हजारो लिटर पाणी तर वाया गेलेच, शिवाय श्रीवर्धनमधील नागरिकांना  पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी विहीर, बोअरवेलचा आश्रय घ्यावा लागला. वास्तविक किमान 10 वर्षांनंतर जलवाहिनी बदलणे किंवा नवीन टाकणे क्रमप्राप्त होते, मात्र प्रत्येक वेळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वेळा जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाण्यावाचून राहावे लागत आहे, तर ठिकठिकाणी वेळवेळी फुटत असलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करताना नगर परिषद कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे. स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे वचन निवडणुकीत दिल्याने नागरिकांनी एकाच पक्षाच्या हाती नगर परिषदेची सत्ता दिली आहे. आमदार, खासदार आणि पालकमंत्रीही त्याच पक्षाचा आहे. तरीसुद्धा श्रीवर्धनमधील नागरिकांना आजतागायत गंजयुक्त व शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत आहे. जीर्ण जलवाहिन्या वेळोवेळी ठिकठिकाणी फुटत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

श्रीवर्धनमधील जलवाहिन्या 40 ते 45 वर्षांपूर्वीच्या असल्याने जीर्ण झाल्या आहेत. रानवली धरणापासून शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा ठराव नगर परिषदेने केला असून, निधी मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल.  

-जितेंद्र सातनाक, प्रभारी नगराध्यक्ष, श्रीवर्धन

श्रीवर्धन नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना आहे, मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न पाहता या योजनेतील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे अशक्य आहे. तरी शासनाने लवकरच या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करावा.

-वसंत यादव, पाणीपुरवठा सभापती, श्रीवर्धन नगर परिषद

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply