पनवेल : प्रतिनिधी
कोविड 19ची लस सुरक्षित असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ही लस घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना लसीकरणासाठी संदेश येत आहेत त्यांनी लस घेणे गरजेचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.कोविड 19 लसीकरण सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणा अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोविड 19ची लस घेतली. त्याचबरोबर उपायुक्त सचिन पवार, आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप यांनीही कोवीड19 ची लस घेतली. नुकतेच काही दिवसांपूर्वी पालिकेतील इतर वरिष्ठ अधिकार्यांनी कोविड 19ची लस घेतली होती. राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे संदेश ज्या लोकांना येत आहेत त्यांनी ही लस आवर्जुन घेऊन कोरोनापासून आपले संरक्षण करावे, असा संदेश अधिकारीवर्गातून नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाच्या लसीकरणाअंतर्गत प्रथम ज्यामध्ये सुरक्षा विभागातील कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना लसीकरण केले जात आहे. पालिकेच्यावतीने सध्या एमजीएम वैद्यकिय महाविद्यालय, येरळा वैद्यकिय महाविद्यालय, टाटा मेमोरिअल सेंटर, लाइफलाइन रुग्णालय, पोलारिस रुग्णालय, सुअस्थ रुग्णाल श्री स्वामी समर्थ (डॉ. नाडकर्णी) रुग्णालय, सदिच्छा रुग्णालय, सुश्रुत रुग्णालय याठिकाणी लसीकरण चालू आहे. आजपर्यंत एकुण आरोग्य कर्मचारी लक्ष 5465 दिले असून त्यापैकी 4858 कर्मचार्याचे लसीकरण पुर्ण झाले आहे. तर फ्रंट लाइन वर्करसाठी एकुण 5601 लक्ष देण्यात आले आहे. यापैकी 1475 जणांना लस देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांत वाढ दिसून येत असल्यामुळे नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर, गर्दी टाळणे, सॅनिटायझर वापरणे, अशा उपायांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.