विविध मागण्यांसाठी समितीची बैठक; पदाधिकार्यांची उपस्थिती
नवी मुंबई ः प्रतिनिधी
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्याविरोधात होणार्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार करण्यात आला. माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भाजप नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. विमानतळ नामकरण आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येत असून 18 मे रोजी होणार्या मध्यवर्ती शिखर समितीच्या बैठकीमध्ये पुढील जनआंदोलनाचे स्वरून घोषित करण्यात येणार असल्याचे समितीच्या समन्वय यांनी या वेळी सांगितले. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, नगरविकास विभागामार्फत 95 गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या गावांसाठी काढण्यात आलेल्या नवीन अध्यादेशाच्या बाबतीत रहिवास आणि उपजीविकेसाठीच्या केलेल्या बांधकामांखालील जमीन मालकी हक्क (गरजेपोटी बांधकाम), ठाणे-बेलापूर पट्टीतील एमआयडीसीचे विविध प्रश्न, प्रत्येक गावांच्या ग्रामस्थांच्या शिवारात (परीघ क्षेत्रात) नव्याने निर्माण होणार्या बांधकाम व पुनर्विकासात स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेऊन रोजगार व स्वयंरोजगारात शासनाने सामावून घेणे आदी स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे मागील 50 वर्षांपासून न सुटलेल्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा करून आंदोलनाच्या स्वरूपाबाबतची मते उपस्थित नेत्यांनी परखडपणे मांडली. या बैठकीस नवी मुंबईच्या सर्व 29 गावांतील सामाजिक संघटनांचे, गावकीचे अध्यक्ष, राजकीय प्रमुख, प्रत्येक गावचे लोकप्रतिनिधी व शहरातील नागरिक प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.