राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातच्या मोटेरा येथील जगातील सर्वांत मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा दिवसरात्र कसोटी सामना खेळला जात आहे.
उद्घाटन समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या स्टेडियमचे स्वप्न बघितले होते, जे आज पूर्ण झाले, असे सांगितले. पंतप्रधान मोदींसोबत खूप वर्षांपासून काम करीत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केले, असेही शाह या वेळी म्हणाले.