महाड : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यासह बिरवाडीमधील अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. त्याचे रीतसर पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानुसार शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र बिरवाडी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मयुर कांबळे यांना अद्याप शासनाचा मदत निधी मिळालेला नाही. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने मयुर कांबळे यांनी गुरुवार (दि. 5) पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बिरवाडी येथील नक्षत्र कॉम्प्लेक्समध्ये मयुर कांबळे यांचे एम. के. इन्फोटेक या नावाने आपले सरकार सेवा केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून ते बिरवाडीसह आजूबाजुच्या खेडोपाड्यांमधील नागरिकांना आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करतात. 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बिरवाडी गावात पुराचे पाणी शिरले होते त्यामध्ये कांबळे यांच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्येदेखील पाणी गेल्याने तेथील लॅपटॉप, फर्निचर, स्टेशनरीचे नुकसान झाले होते. त्याचा प्रशासनाकडून रीतसर पंचनामा करण्यात आला होता. मात्र शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना मिळाली नाही. याबाबत मयुर कांबळे यांनी महाड तहसील कार्यालयामधून माहिती घेतली असता, आपले सरकार सेवा केंद्र आस्थापनामध्ये मोडत असल्याने तुम्हाला मदत मिळणार नाही, असे मयुर कांबळे यांनी सांगण्यात आले. मयुर कांबळे यांनी मंत्रालयात जाऊन मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना एक लेखी पत्र देऊन मदतनिधी मिळावा यासाठी विनंती केली होती. त्याअनुषंगाने मंत्रालयातून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महाडच्या उपविभागीय अधिकार्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याला सुमारे दोन महिने झाले तरी कोणतीच हालचाल झाली नसल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे मयुर कांबळे यांनी सांगितले.